ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा १३ धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून मालिकाही काबीज केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना २९ धावांनी जिंकला होता.
यानंतर आज (१६ नोव्हेंबर) सिडनी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १९.४ षटकांत सर्व गडी गमावून १३४ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून स्पेन्सर जॉन्सनने सर्वाधिक ५ बळी घेतले.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अतिशय सामान्य होती. मॅथ्यू शॉर्टने संघाकडून सर्वाधिक ३२ धावांची खेळी खेळली. याशिवाय ॲरॉन हार्डलीने २८, ग्लेन मॅक्सवेलने २१ आणि जॅक फ्रेझर मॅकगर्कने २० धावांचे योगदान दिले.
पाकिस्तानच्या गोलंदाजीत हारिस रौफने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली. हरिस रौफने चार षटकात केवळ २२ धावा देत ४ बळी घेतले. याशिवाय अब्बास आफ्रिदीनेही तगडी गोलंदाजी करत ४ षटकात केवळ १७ धावा देत ३ बळी घेतले, तर सुफियान मुकीनने ४ षटकात २१ धावा देत 2 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाची फलंदाजीही दयनीय झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्सनने ५ विकेट घेतल्या. स्पेन्सर जॉन्सनने ४ षटकात केवळ २६ धावा देत ५ बळी घेतले. याशिवाय ॲडम झाम्पानेही ४ षटकात १९ धावा देऊन २ बळी घेतले तर झेवियर बार्टलेटने १ बळी घेतला.
पाकिस्तानच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, उस्मान खान आणि इरफान खान वगळता सर्वजण फ्लॉप ठरले. उस्मान खानने संघासाठी ३८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. याशिवाय इरफानने २८ चेंडूत ३७ धावा करून नाबाद राहिला. अशा प्रकारे पाकिस्तानचा संघ १३४ धावांवर ऑलआऊट झाला.