भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने त्याच्या ODI कारकिर्दीत २९६ सामन्यांच्या २८३ डावात १३,९०६ धावा केल्या आहेत. विराट सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. पण तुम्हाला माहित आहे का की विराटने ७ वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर २०१८ रोजी सर्वात जलद १० हजार धावा करण्याचा पराक्रम केला होता. त्याने या महाविक्रमात सचिन तेंडुलकरला मागे टाकले होते.
विराटने २४ ऑक्टोबर २०१८ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीने १० हजार वनडे धावा पूर्ण करण्यासाठी एकूण २०५ डाव खेळले. त्याचवेळी ही कामगिरी करण्यासाठी सचिनला २५९ वेळा फलंदाजीला यावे लागले. या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार सौरव गांगुली आहे.
गांगुलीने २६३ डावांनंतर १० हजार वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. रिकी पाँटिंगने २६६ आणि जॅक कॅलिसने २७२ सामन्यात ही कामगिरी केली होती.
दरम्यान, विराटने ज्या सामन्यात १० हजार धावांचा टप्पा गाठला होता, तो खूपच रोमहर्षक होता. विशाखापट्टणम येथे झालेला हा सामना टाय झाला होता. कोहलीच्या नाबाद १५७ धावांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगली लढत दिली.
शिमरॉन हेटमायरच्या ९४ आणि शाई होपच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजनेही ३२१ धावा केल्या. अखेरच्या षटकात विंडीजला १४ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर शाय होपने चौकार मारला आणि धावसंख्या बरोबरीत सुटली.
संबंधित बातम्या