भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने आपली १०० वी कसोटी संस्मरणीय बनवली आहे. बांगलादेशच्या कसोटीत त्याने अप्रतिम शतकी खेळी केली आहे.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी लोकल बॉय अश्विनने दमदार खेळ दाखवला.
ज्या गोलंदाजांविरुद्ध रोहित आणि विराटसारख्या दिग्गजांनी शरणागती पत्करली त्या गोलंदाजांना अश्विनने झोडपून काढले. अश्विनने अनुभव पणाला लावत प्रतिकूल परिस्थितीत आपले सहावे कसोटी शतक झळकावले.
विशेष म्हणजे त्याने केवळ १०९ चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने शाकिब-अल-हसनची चांगलीच धुलाई केली. त्याच्या गोलंदाजीवर त्याने जबरदस्त षटकार ठोकला. यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेली एक आजीबाई सुद्धा उठून टाळ्या वाजवताना दिसल्या.
अश्विनच्या या षटकारावर आजीबाईंनी केलेला आनंदोत्सव आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
अश्विन-जडेजाची भागीदारी तोडण्यासाठी बांगलादेशचा कर्णधार नजमल हसन शांतोने ५३ व्या षटकात शाकिब-अल-हसनला प्रथमच गोलंदाजीला उतरवले. जडेजाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि पुढच्या चेंडूवर सिंगल घेत अश्विनला स्ट्राईक दिली.
शकीबने तिसरा चेंडू सरळ टाकला, संधीची वाट पाहत असलेल्या अश्विनने स्लॉग स्वीपवर मिड-विकेटवर शानदार षटकार ठोकला.
यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेला उभे राहून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. तेवढ्यात कॅमेरामनने हा प्रसंग अचूक टिपला. आजीबाईंना मोठ्या स्क्रिनवर दाखवता स्टेडियममधील चाहत्यांनी जबरदस्त जल्लोष केला.
आक्रमक फलंदाजी दाखवत रविचंद्रन अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. रविचंद्रन यांच्या कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान शतकही आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने सहा गडी गमावून ३३९ धावा केल्या आहेत. अश्विन ११२ चेंडूत १०२ धावा करून नाबाद परतला तर रवींद्र जडेजाने ११७ चेंडूत ८६ धावा केल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमूल हसन शांतो याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडिया अडचणीत सापडली होती, पण यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी डाव सांभाळला आणि संघाला ३०० चा टप्पा पार करून दिला.
जड्डूने अश्विनसोबत १९५ धावांची भागीदारी केली. जडेजा आणि अश्विनच्या या भागीदारीने अनेक विक्रम मोडीत काढले.दोघांनी २२७ चेंडूंचा सामना केला.
भारताची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा ६ धावा करून बाद झाला. शुभमन गिल शून्यावर बाद झाला. तर विराट कोहली केवळ ६ धावा तंबूत परतला. तर ऋषभ पंतने ५२ चेंडूत ३९ धावा केल्या. तर केएल राहुल १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले. त्याने ११८ चेंडूंचा सामना करत ५६ धावा केल्या. यशस्वीने ९ चौकार मारले.