NZ vs SA Semi Final Highlights : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा दुसरा उपांत्य सामना आज (५ मार्च) न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५० धावांनी विजय मिळवला.
यासह न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला असून आता अंतिम फेरीत त्यांचा सामना भारताशी होणार आहे. याआधी ४ मार्च रोजी टीम इंडियाने पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची फायनल ९ मार्च रोजी दुबईमध्ये खेळली जाईल.
तत्पूर्वी, या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर किवी फलंदाजांनी धुमाकूळ घातला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी शतकी खेळी खेळली. रवींद्रने १०८ आणि विल्यमसनने १०२ धावा केल्या.
अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन फिलिप्सने ४९ धावांची झंझावाती खेळी खेळली आणि न्यूझीलंडला ३६२ धावांची विक्रमी धावसंख्या गाठता आली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती.
दक्षिण आफ्रिका आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत म्हणजेच बाद फेरीत पराभूत होतो. या कारणामुळे त्यांच्यावर चोकर्सचा टॅग लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीतही असेच काहीसे घडले होते. हा तोच दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्याने ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना गमावला नाही आणि ब गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली.
दक्षिण आफ्रिकेला विक्रमी ३६३ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. कर्णधार टेंबा बावुमाने ५६ धावा केल्या आणि रॅसी व्हॅन डर डुसेनने ६९ धावांचे अर्धशतक झळकावले, परंतु मधल्या षटकांमध्ये कोणतीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. डेव्हिड मिलरने ६७ चेंडूत १०० धावांचं झंझावाती शतक झळकावलं. या शतकी खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले, मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
संबंधित बातम्या