New Zealand Vs Australia 1st Test Day 3 Highlights : ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ३ बाद १११ धावा केल्या आहेत. त्यांना सामना जिंकण्यासाठी आणखी २५८ धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी ७ विकेट्सची गरज आहे.
तत्पूर्वी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२ मार्च) न्यूझीलंडचा कामचलाऊ ऑफस्पिनर ग्लेन फिलिप्सने ४५ धावांत ५ बळी घेतले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या १६४ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २०४ धावांची आघाडी मिळाली होती. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३६९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
यानंतर या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ३ बाद १११ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड लक्ष्यापेक्षा २५८ धावांनी मागे आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने सकाळी आपला दुसरा डाव २ बाद १३ धावांवर सुरू केला. पण त्यांना फार काळ फलंदाजी करता आली नाही. न्यूझीलंडकून फिलिप्सने कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला.
फिरकीपटू ग्लेन फिलिप्सने उस्मान ख्वाजा (२८), पहिल्या डावात शतक ठोकणारा कॅमेरॉन ग्रीन (३४), ट्रॅव्हिस हेड (२९), मिचेल मार्श (००) आणि ॲलेक्स कॅरी (०३) यांना बाद केले. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने ३६ धावांत ३ बळी घेतले. ग्लेन फिलिप्सच्या या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करण्यात यश आले.
तिसऱ्या दिवशी रचिन रविंद्र नाबाद ५६ आणि डॅरिल मिशेल १२ हे नाबाद परतले आहे. चौथ्या दिवशी या दोघांवरच न्यूझीलंडची मदार आहे.
न्यूझीलंडने अखेरच्या सत्रात केन विल्यमसनची (०९) महत्वाची विकेट गमावली. पहिल्या डावात शुन्यावर धावबाद झालेला विल्यमसन दुसऱ्या डावात स्लीपमध्ये झेलबाद झाला. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे सामना अनिर्णितही राहू शकतो.
संबंधित बातम्या