न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळही रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांचे एक लज्जास्पद कृत्य समोर आले आहे.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, मात्र आता या मैदानाच्या दुरवस्थेचे पडसाद संपूर्ण क्रिकेट विश्वात उमटले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली. यानंतर या स्टेडियममधील सुविधांच्या अभावामुळे जगभरातून मॅनेजमेंटवर टीका होत आहे.
ग्रेटर नोएडा येथील स्टेडियमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. येथे मैदान सुखवण्यासाठी पंख्यांचा वापर केला जात असल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
अशातच आता खानपान सुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एका नवीन फोटोत असे दिसते की स्वयंपाकी वॉशरूममधून भांड्यात पाणी भरत आहे.
संपूर्ण ग्राउंड स्टाफ एकीकडे स्टेडियम कोरडे करण्यासाठी मेहनत घेत आहे. मैदान सुखवणे ही ग्राऊंड स्टाफसाठी मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. आता स्वयंपाकी वॉशरुमच्या वॉश-बेसिनमध्ये भांडी धुताना पकडला गेला. तसेच, तिथूनच स्वयंपाक करण्यासाठी भांड्यात पाणी भरतानाही दिसत आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या मैदानाच्या सुविधांबाबत यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “येथे सुविधा नावाची कोणतीही गोष्ट नाही. आम्ही लखनौच्या मैदानाची मागणी केली होती.”
एसीबीच्या या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, या मैदानात सामान्य सुविधाही उपलब्ध नाहीत. येथे मॅनेजमेंट नावाची गोष्ट नाही आणि खेळाडूही सुविधांबाबत खूश नाहीत'.
गेल्या १० दिवसांपासून उत्तर भारतात सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर नोएडाचे मैदान ओले झाले होते. मैदान ओले असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. नाणेफेकही झाली नाही.
दुसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला, पण मैदानावरील कर्मचारी दुसऱ्या दिवशीही खेळपट्टी आणि मैदान कोरडे करू शकले नाहीत. त्यामुळे दुसरा दिवसही रद्द घोषित करण्यात आला आहे.