Nepal Premier League 2024 Final : नेपाळ प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना (NPL 2024 Final ) आज (२१ डिसेंबर) जनकपूर बोल्ट आणि सुदूर पश्चिम रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात जनकपूर संघाने सुदूर पश्चिम संघाचा ५ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. जनकपूर पहिल्या सीझनचा चॅम्पियन संघ ठरला आहे.
दीपेंद्र सिंग ऐरी याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. दीपेंद्र हा सुदूर पश्चिम संघाचा कर्णधार आहे. त्याने ९ सामन्यात २२७ धावा केल्या आहेत. यासोबतच ९ विकेट्सही घेतल्या.
अंतिम सामन्यात सुदूर पश्चिम संघाने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या. यादरम्यान सैफने जोरदार बॅटिंग केली. त्याने ४३ चेंडूत ६९ धावा केल्या. तर विनोद भंडारीने ४१ धावांची दमदार खेळी केली. कर्णधार दीपेंद्र सिंग ऐरी ९ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात जनकपूरने ५ गडी गमावून सामना जिंकला. लाहिरू मिलंथा याने त्यांच्यासाठी मॅच विनिंग इनिंग खेळली. त्याने ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या.
अंतिम सामन्यातील विजय जनकपूरसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण हा संघ नेपाळ प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनची चॅम्पियन बनला आहे. मिलंथाने जनकपूरसाठी दमदार कामगिरी केली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर राहिला. त्याने १० सामन्यात २९३ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने २ अर्धशतके झळकावली. जिमी नीशमनेही संघासाठी चांगली कामगिरी केली. त्याने २४७ धावा केल्या.
जनकपूर बोल्ट संघाला बक्षीस म्हणून ११ मिलियन नेपाळी रुपये मिळाले आहेत. जेम्स नीशमला इलेक्ट्रिक प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला आहे. त्याला २ लाख नेपाळी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. ललित राजबंशी याची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. त्याला इलेक्ट्रिक बाईक मिळाली. तर स्पर्धेचा सर्वोत्तम प्लेयर दीपेंद्र सिंह ऐरी याला कार मिळाली.