Pakistan vs west indies Test : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून मुलतानमध्ये खेळला जात आहे. शनिवारी (२५ जानेवारी) सामन्याच्या पहिल्याच दिवशी ३८ वर्षीय नोमान अली याने आपल्या घातक गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची तारांबळ उडवली.
पाकिस्तानच्या नोमान अली याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी हॅटट्रिक घेत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज ठरला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नोमान अलीच्या फिरणाऱ्या चेंडूंना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. याचा परिणाम असा झाला की ५४ धावांच्या स्कोअरवर त्यांनी ८ विकेट गमावल्या.
नोमान अली अलीकडच्या काळात कर्णधार शान मसूदसाठी ट्रम्प कार्ड म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे मुलतान कसोटीच्या पहिल्या दिवशी शानने त्याच्याकडे ८व्या षटकातच चेंडू सोपवला. यानंतर नोमानने आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवत दुसऱ्याच षटकातच विकेट घेतली.
यानंतर तो डावाच्या १२व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि त्याने एकापाठोपाठ एक ३ बळी घेत इतिहास रचला. त्याने षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर जस्टिन ग्रीव्हज, टेविन इम्लाच आणि केविन सिंक्लेअर यांना बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. कसोटीत ही कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंड मालिकेपासून नोमानने कहर केला आहे. सध्याच्या मालिकेतही त्याने हा ट्रेंड सुरू ठेवला आहे. पहिल्या कसोटीतही त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यात त्याने ८ षटकात १९ धावा देत ४ बळी घेतले आणि वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे.
पाकिस्तान संघाला फिरकीच्या रूपाने कसोटीत जिंकण्याचा नवा फॉर्म्युला सापडला आहे. त्याचाच वापर त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धही केला. पाकिस्तानच्या या फॉर्म्युल्यापुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कर्णधार शान मसूदने टर्निंग ट्रॅकवर पहिल्याच षटकापासून फिरकी आक्रमणाला सुरुवात केली. त्याने ऑफस्पिनर साजिद खानसोबत डावाची सुरुवात केली.
मात्र, पहिले यश काशिफ अली याने मिळवून दिले. मात्र यानंतर फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला. साजिद खानने २, नोमान अलीने ३ आणि लेगस्पिनर अबरार अहमदने १ बळी घेतला.
अशाप्रकारे पाकिस्तानने वेस्ट इंडिजच्या ८ फलंदाजांना ५४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वृत्त लिहेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने ८ विकेट गमावून ७५ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या