Rajeev Shukla News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले. इतकेच नाहीतर बीसीसीआयच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही पाठिंबा दिला.
पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माने या मालिकेत तीन सामने खेळले आणि त्याच्या बॅटमधून केवळ ३१ धावा आल्या. या मालिकेत भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकाकी झुंज दिली. सिडनीतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत रोहितने स्वत:ला बाहेर ठेवले, कारण त्याला मैदानात मजबूत संघ हवा होता. परंतु, बुमराहला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता न आल्याने संघ तेथेही पराभूत झाला.
रोहितच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यात आणि गंभीरमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती. यावर राजीव शुक्ला म्हणाले की, 'हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक यांच्यात मतभेद नाहीत, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातही मतभेद नाही. ही सगळी अफवा आहे, जी प्रसारमाध्यमांच्या एका वर्गाकडून पसरवली जात आहे.
गंभीरने वरिष्ठ खेळाडूंना एकतर चांगली कामगिरी करा किंवा वगळण्यासाठी तयार रहा, असा अल्टिमेटम दिला होता, अशी चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राजीव शुक्ला म्हणाले, ‘रोहितने कर्णधारपदाचा आग्रह धरला आहे, हेही चुकीचे आहे. तो कॅप्टन आहे. फॉर्मात असणे किंवा नसणे हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा रोहित पाहिले की तो फॉर्ममध्ये नाही, तेव्हा त्याने स्वत: ला पाचव्या कसोटीतून बाहेर ठेवले.’
संघाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी नुकतीच घेण्यात आलेली आढावा बैठक पूर्ण झाल्याचेही शुक्ला यांनी सांगितले. ‘आम्ही पुढील वाटचाल आणि अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल? यावर चर्चा केली. दरम्यान, ११ जानेवारी रोजी बीसीसीआयने बीजीटीसंदर्भात आढावा बैठक घेतली होती. भारताला न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर भारताला १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून ३-१ अशी मालिका गमवावी लागली आहे. अशा वेळी संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घ्यावा लागला’, अशीही माहिती त्यांनी दिली.
संबंधित बातम्या