टीम इंडियाचा नवा स्टार नितीश रेड्डी याने मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावून आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले. शतक पूर्ण केल्यानंतर तो गुडघ्यावर बसला आणि त्यानंतर आपले हेल्मेट बॅटवर टेकवले.
त्याची सेलिब्रेशन करण्याची पद्धत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्याच्यासह टीम इंडियाचा संपूर्ण डगआऊट या ऐतिहासिक खेळीने उत्साहित झाला. आता नितीश यानेच या सेलिब्रेशनचे रहस्य उघड केले आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नितीश रेड्डी यानेनी त्याच्या सेलिब्रेशनचे कारण स्पष्ट केले आणि म्हटले की, "शतक पूर्ण केल्यानंतर मी बॅट ठेवली आणि त्यावर हेल्मेट ठेवले. हेल्मेटवर तिरंगा आहे आणि मी तिरंग्याला सलाम करत होतो. देशासाठी खेळणे ही भावनाच माझ्यासाठ सर्वात मोठा प्रेरणा स्रोत असल्याचेही नितीशने सांगितले."
नितीश रेड्डीने तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरसोबत १२८ धावांची भागीदारी केली. या कसोटी सामन्यात नितीशने ११४ धावांची खेळी केली, तर सुंदरने ५० धावांचे योगदान दिले. नितीश रेड्डीने तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केल्यानंतर त्यांचे वडील मुत्यालू रेड्डी भावून झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही वाहत होते.
बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ऑलआउट करू शकला नाही. ९१ धावांत ६ विकेट पडल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर ९ विकेटवर २२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ११० चेंडूं खेळून काढले. दहाव्या क्रमांकावरील नॅथन लायन ४१ आणि आकराव्या क्रमांकावर आलेल्या स्कॉट बोलंड १० धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा केल्या होत्या आणि भारताने ३६९ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली आहे.