Nitish Kumar Reddy Replaced Hardik Pandya : नितीश कुमार रेड्डी याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि आपल्या पदार्पणाच्या मालिकेत आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ञांना प्रभावित केले. त्याने मेलबर्नमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले आहे. तो मध्यमगती गोलंदाजीही करतो.
या सर्व बाबींमुळे नितीश रेड्डीने दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना आपला चाहता बनवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये नितीश सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
सुनील गावसकर यांनी एका माध्यम संस्थेच्या माध्यमातून सांगितले की, नितीश रेड्डीने आतापर्यंत जितके सामने खेळले आहेत, तेवढ्या सामन्यात हार्दिकने त्याच्या करिअरमध्ये एवढी उंची गाठली नव्हती. नितीशने कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूची जागा भरून काढल्याचे गावस्कर सांगतात.
गावस्कर म्हणाले, "हार्दिक पांड्या कसोटी संघातून बाहेर पडल्यापासून, टीम इंडियाला मध्यमगती गोलंदाजीसह फलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत होती.
नितीश रेड्डी याला गोलंदाजीत अजून सुधारणा करायची आहे, पण फलंदाज म्हणून नितीशने करिअर सुरू केले तेव्हा हार्दिकपेक्षा तो सरस दिसत आहे.
हार्दिक पांड्या अखेरचा भारताकडून २०१८ मध्ये कसोटी सामना खेळताना दिसला होता. दुर्दैवाने, तेव्हापासून पाठीची दुखापत त्याला सतत त्रास देत आहे, त्यामुळे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ गोलंदाजी करता आली नाही. तेव्हापासून तो केवळ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या तरी नितीश रेड्डी हाच जणू कसोटी संघात हार्दिक पांड्यासारखी भूमिका बजावू शकतो असे दिसते आहे.