Nitish Kumar Reddy Meet Family After Century : भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याच्यासाठी शनिवार (२८ डिसेंबर) हा दिवस खूप खास होता. या दिवशी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत आपले शतक पूर्ण केले.
दिवसाचा खेळ संपल्यानंतर रेड्डीने आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. रेड्डी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या भेटीचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
शतक झळकावणारा रेड्डी हसऱ्या चेहऱ्याने कुटुंबाला भेटतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रथम नितीशच्या आईने त्याला मिठी मारली आणि नंतर भारतीय अष्टपैलू खेळाडूने त्याच्या बहिणीला मिठी मारली. यानंतर तो वडिलांना मिठी मारतो. यावेळी त्याचे वडील मुत्यालू रेड्डी खूपच भावूक दिसत आहेत.
या भेटी दरम्यान नितीशचे वडील म्हणाले, "नितीश आज खूप चांगला खेळला. मला खूप अभिमान आहे. आम्ही खूप संघर्ष केला आहे. आम्ही भारतीय संघाचे आभारी आहोत."
पुढे, नितीश याची बहीण तेजस्वी रेड्डी म्हणाली, “हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. मी एवढेच सांगू शकते की आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे आणि खूप आनंद झाला आहे.”
नितीशने शतक झळकावले तेव्हा मुत्यालू रेड्डी हे स्टँडमध्ये उपस्थित होते. तेव्हा ते खूपच भावूक झाले होते. वडिलांनी आधी नितीशचे शतक साजरे केले आणि नंतर ते भावूक झाले.
चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) भारताने आपला डाव ३५८/९ धावांवरून पुढे वाढवला. संघाने स्कोअरबोर्डमध्ये केवळ ११ धावांची भर घातली आणि ३६९ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी घेतली होती.
नॅथन लायनने नितीश रेड्डीला मिचेल स्टार्ककडे झेलबाद करून भारतीय संघाचा डाव गुंडाळला. नितीशने १८९ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११४ धावा केल्या. नितीशच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.
संबंधित बातम्या