Nitish Reddy Father Reaction On Century : मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या चौथ्या कसोटीत नितीश कुमार रेड्डी याने शानदार शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाजी आक्रमण नितीशपुढे गुडघे टेकताना दिसला.
शतक पूर्ण केल्यानंतर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांची रिअॅक्शन झटपट व्हायरल झाली. मेलबर्नमध्ये आपल्या मुलाने शतक झळकावल्याचे पाहून वडिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. वडिलांनी आपल्या मुलाचे शतक साजरे केले यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
नितीश रेड्डीने १७१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याच्या शतकी खेळीने टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेले आहे.
नितीशसोबत वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली. रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ (२८५ चेंडू) धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी करता आली.
नितीशने या संपूर्ण मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. या शतकापूर्वी त्याने तीनदा ४० हून अधिक धावा केल्या होत्या. पण त्याला आपल्या शानदार सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. मात्र, आज तसे झाले नाही.
या शतकादरम्यान रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे. रेड्डीने शतक झळकावताना १० चौकार आणि १ षटकार मारला. बातमी लिहिपर्यंत रेड्डी अजूनही नाबाद असून १०४ धावांवर खेळत आहे.
वास्तविक, नितीश कुमार रेड्डी जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. टीम इंडियाच्या ६ विकेट १९१ रन्सवर पडल्या होत्या.
फॉलोऑनचा धोका भारतावर होता. पंत बाद झाल्यानंतर काही वेळातच अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजाही बाद झाला. यानंतर वॉशिंग्टन सुंदरसह नितीश रेड्डी यांनी भारताला फॉलोऑनपासून वाचवले आणि आघाडी हळूहळू कमी केली.
आठव्या विकेटसाठी सुंदर आणि नितीश यांनी मिळून भारतासाठी १२७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीने भारताला सामन्यात परत आणले आहे. एकेकाळी टीम इंडियाला फॉलोऑन खेळावा लागेल असे वाटत होते. पण आता भारत ज्या स्थितीत उभा आहे. तिथून सामना जिंकणे अशक्य नाही.
संबंधित बातम्या