U19 Women's World Cup : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकात नवख्या नायजेरियानं न्यूझीलंडला पराभव करून क्रिकेटविश्व हलवून टाकलं आहे. पावसानं व्यत्यय आणलेला हा सामना नायजेरियन संघाने २ धावांनी जिंकला. नायजेरियाच्या विजयामुळं न्यूझीलंडचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.
मलेशियात सध्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक सुरू आहे. न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता नायजेरियानं दिलेल्या धक्क्यामुळं न्यूझीलंडही स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.
नायजेरियन संघानं प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून ६५ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना किवी संघाला ६ गडी गमावून केवळ ६३ धावांपर्यंत मजल मारता आली.
या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नायजेरियाकडून कर्णधार लकी पायटीनं २२ चेंडूत १८ तर लिलियन उदेहनं २५ चेंडूत १९ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर नायजेरियाला १३ षटकांत ६ गडी गमावून ६५ धावा करण्यात यश आलं.
६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. नायजेरियाला डावाच्या पहिल्याच चेंडूवर यश मिळालं, केट इर्विन रन आऊट झाली. यानंतर एम्मा मॅक्लिओडही तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ३ धावांवर बाद झाली. न्यूझीलंडनं १३ चेंडूत ७ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी झुंज दिली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर नायजेरियाच्या खात्यात तीन गुण असून तो गट-क गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या