वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज निकोलस पूरन याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या ८ महिन्यांत पुरनने आपल्याच देशाचा माजी दिग्गज ख्रिस गेल याचा विक्रम मोडला आहे. वास्तविक, पूरन आता एका वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.
निकोलस पूरन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पूरनसमोर मोठमोठे गोलंदाजही फिके दिसतात. पूरनने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचेच होश उडवले आहेत. पूरनने या वर्षातील अवघ्या ८ महिन्यांत एवढे षटकार ठोकले आहेत की, यामुळे ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघाला.
निकोलस पूरन सध्या त्याच्या देशाची फ्रेंचाइजी लीग कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यावर्षी निकोलस पूरन त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात पुरनने ९७ धावांची शानदार खेळी केली. या डावात त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ९ षटकार आले.
पूरनने या वर्षात म्हणजे २०२४ मध्ये आतापर्यंत १३९ षटकार मारले आहेत. यासोबत एका वर्षात टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने २०१५ मध्ये १३५ षटकार मारले होते. मात्र, आता ९ वर्षांनंतर पुरनने हा विक्रम मोडला आहे.
पुरनला अजूनही कॅरेबियन लीगमध्ये अनेक सामने खेळायचे आहेत. याशिवाय तो इतर अनेक लीगमध्ये खेळताना दिसतो. अशा परिस्थितीत पूरन लवकरच टी-20 मध्ये एका वर्षात २०० षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनू शकतो. त्याच्याकडे असा महापराक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.
निकोलस पूरन- २०२४- १३९ षटकार
आंद्रे रसेल- २०१९- १०१ षटकार
ख्रिस गेल- २०१६- ११२ षटकार
ख्रिस गेल- २०१५- १३५ षटकार
ख्रिस गेल- २०१२- १२१ षटकार