टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना आजपासून (२४ ऑक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडला २५९ धावांवर सर्वबाद केले.
नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाने चांगली सुरुवात केली. किवी संघाने एकवेळ बिनबाद ३२ धावा केल्या होत्या. पण यानंतर आर अश्विनने या धावसंख्येवर भारताला पहिले यश मिळाले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात किवी कर्णधार टॉम लॅथमला (१५) पायचीत केले.
यानंतर न्यूझीलंडला दुसरा धक्का विल यंगच्या (१८) रूपाने पडला. जो अश्विनच्या चेंडूवर यष्टिरक्षक पंतच्या हाती झेलबाद झाला. यानंतर रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे (७६) यांनी स्कोअरकार्ड १३८ पर्यंत नेला. रचिन आणि कॉनवे सेटल झाल्याचंही वाटत होतं, पण अश्विन पुन्हा एकदा भारतासाठी ट्रबलशूटर ठरला आणि भारताची तिसरी विकेट मिळवली.
बेंगळुरूमधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला रचिन रवींद्र पुण्यातही फॉर्मात दिसला, तो शतक करेल असे वाटत होते, पण तो वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत अडकला आणि ६५ धावा करून क्लीन बोल्ड झाला. यानंतर न्यूझीलंड संघाच्या खात्यात आणखी ४ धावा जमा झाल्या आणि यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल (३) धावा करून क्लीन बोल्ड झाला.
त्यानंतर सुंदरने डॅरिल मिशेलला (१८) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. ग्लेन फिलिप्स काही विशेष करू शकला नाही आणि त्यालाही सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फिलिप्स बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या २३६/७ अशी होती.
यानंतर सुंदरने टीम साऊदी (५), एजाज पटेल (४) आणि मिचेल सँटनर (३३) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. सुंदरने ५९ धावांत ७ गडी बाद केले. सुंदरने पहिल्यांदाच कसोटी डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने ३ विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या