टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज (१ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे. भारतीय संघाने ही आधीच मालिका गमावली आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीनेही हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ईश सोढी आणि मॅट हेन्री यांचा न्यूझीलंड संघात समावेश झाला आहे. मिचेल सँटनर आणि टिम साउथी या सामन्याचा भाग नाहीत.
भारत- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉवी, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाझ पटेल, विल्यम ओ'रुर्के.
मुंबई टेस्टसाठी वानखेडे स्टेडिमयच्या पीचवर थोडे गवत असून पहिल्या दिवशी हे पिच बॅटिंगसाठी अनुकूल असेल. दुसऱ्या दिवसापासून हे पिच स्पिन बॉलर्सला मदत करेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना झाला होता. त्या मॅचमध्ये भारताने न्यूझीलंडचा ३७२ रन्सनी दणदणीत पराभव केला होता. स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर न्यूझीलंडची इनिंग ६२ आणि १६७ धावांत गारद झाली होती.
टीम इंडियाने पहिल्या डावात ३२५ तर दुसऱ्या डावात ७ बाद २७६ धावा केल्या होत्या. आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून ८ बळी घेतले होते. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं पहिल्या इनिंगमध्ये सर्व १० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या डावातही ४ विकेट्स घेतल्या होत्या.