भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला १४७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. सामन्याचा आज (३ नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. आज न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात १७४ धावांवर ऑलआऊट झाला, त्यानंतर टीम इंडियाला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले.
न्यूझीलंडचे एकूण ६ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक विकेट घेतल्या. याशिवाय रविचंद्रन अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांना १-१ विकेट मिळाली.
तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताला २८ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात काही खास नव्हती. पहिल्याच षटकात न्यूझीलंडने कर्णधार टॉम लॅथमची विकेट गमावली, तो एक धाव करून आकाश दीपच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
यानंतर वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला, जेव्हा त्याने डेव्हन कॉनवेला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ३९/२ होती. कॉनवेने २२ धावा केल्या. भारतीय संघाला लवकरच तिसरे यश मिळाले, रचिन रवींद्रने (४ धावा) मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आर. अश्विनच्या चेंडूवर स्टंप्मिंग आऊट झाला.
यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही धोकादायक भागीदारी संपुष्टात आणण्याचे काम रवींद्र जडेजाने केले. त्याने मिशेलला आर. अश्विनने झेलबाद केले. मिशेलने ४४ चेंडूत २१ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार होता.
त्यानंतर जडेजाने यष्टिरक्षक टॉम ब्लंडेललाही बोल्ड केले, तो केवळ ४ धावा करू शकला. ब्लंडेल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद १०० अशी होती.
टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या ग्लेन फिलिप्सने आक्रमक फलंदाजी करत तीन षटकार ठोकले. अश्विनने त्याची झंझावाती खेळी संपवली. फिलिप्स २६ धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. फिलिप्स बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १३१/६ अशी होती.
यानंतर रवींद्र जडेजाने ईश सोधीला बाद करून न्यूझीलंडला सातवा धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंगला वॉक केले. यंगने १०० चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने मॅट हेन्रीला (१० धावा) बोल्ड केले.
यानंतर आज तिसऱ्या दिवशी (३ नोव्हेंबर) रवींद्र जडेजाने एजाज पटेलला आकाशदीपकरवी झेलबाद केले आणि न्यूझींलडचा डाव संपवला. न्यूझीलंडला आज त्यांच्या धावसंख्येत केवळ ३ धावांची भर घालता आली.