South Africa vs New Zealand Semi Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३६३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रच्या शतकांनंतर डेथ ओव्हर्समध्ये डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शानदार फलंदाजी केली.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी संथ सुरुवात केली. न्यूझीलंडला पहिला धक्का विल यंगच्या रूपाने बसला. त्याला लुंगी एनगिडीने बाद केले. पण यानंतर रचिन रवींद्र आणि केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी तडफडवले.
रचिन रवींद्रने शानदार शतक झळकावले, त्याने १०१ चेंडूत १०८ धावा केल्या. या खेळीत त्याने १३ चौकार आणि १ षटकार लगावला.
केन विल्यमसननेही आपले शतक पूर्ण केले. त्याने ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. या काळात विल्यमसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १९ हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
डॅरिल मिशेलने शेवटच्या षटकांमध्ये शानदार खेळी करत संघाची धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. मात्र, तो अर्धशतकापासून १ धावा दूर राहिला. ३७ चेंडूत ४९ धावा करून तो बाद झाला, या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.
ग्लेन फिलिप्स २७ चेंडूत ४९ धावा करून नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीने प्रत्येकी २ बळी घेतले.
संबंधित बातम्या