महिला टी-20 विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजला ८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयानंतर न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे.
दरम्यान वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला पण यानंतर अनुभवी फिरकी गोलंदाज सुझी बेट्सने पुढच्या ५ चेंडूत केवळ दोन धावा करून दिल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने २० षटकांत ९ बाद १२८ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ २० षटकांत ८ विकेट गमावून १२० धावाच करू शकला. अशा प्रकारे न्यूझीलंडने ८ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला.
पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्स राखून पराभव केला. त्याचवेळी आता न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. रविवारी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिेका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील विजेतेपदाचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. किवी फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. न्यूझीलंडसाठी जॉर्जिया प्लंबरने ३१ चेंडूत सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर अनुभवी फलंदाज सुझी बेट्सने २८ चेंडूत २६ धावांचे योगदान दिले. ब्रुक हॉलिडेने ९ चेंडूत १८ धावांची उपयुक्त खेळी खेळली. तर इसाबेला गेजने १४ चेंडूत २० धावा करत संघाला १२० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
वेस्ट इंडिजकडून डेंट्रा डॉटिनने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय एफी फ्लेचरला २ विकेट मिळाले. करिश्मा रामचरक आणि आलिया ॲलेने १-१ फलंदाज बाद केले.
यानंतर न्यूझीलंडच्या १२८ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. कॅरेबियन फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. वेस्ट इंडिजकडून डेन्ट्रा डॉटिनने २२ चेंडूत ३३ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. एफी फ्लेचरने १५ चेंडूत १७ धावा केल्या. तर हेली मॅथ्यूजने २१ चेंडूत १५ धावांची खेळी केली.
न्यूझीलंडकडून एडन कारसनने सर्वाधिक ३ बळी घेतले. अमेलिया केरला २ विकेट मिळाले. याशिवाय फ्रान जोनास, लेह ताहुहू आणि सुझी बेट्स यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
संबंधित बातम्या