आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी न्यूझीलंडने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यावेळी अनुभवी मिचेल सँटनर संघाचे नेतृत्व करत आहे तर केन विल्यमसन (Kane Williamson) फलंदाज म्हणून खेळणार आहे. अलीकडेच न्यूझीलंडने घरच्या मैदानावर श्रीलंकेसोबत ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली, ज्यामध्ये त्यांनी २-१ ने विजय मिळवला.
फलंदाजीत केन विल्यमसन याच्यासोबत विल यंग, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल सारखे तगडे खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांचा समावेश आहे.
तर गोलंदाजीतही संघाकडे चांगले पर्याय आहेत. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीमध्ये मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, बेन सियर्स आणि विल्यम ओरूर्के हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दम दाखवताना दिसतील. फिरकीमध्ये न्यूझीलंडकडे सॅन्टनर, ब्रेसवेल आणि फिलिप्सचा पर्याय असेल.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, 'जरी चॅम्पियन्स ट्रॉफी काही वर्षांपासून खेळली गेली नसली तरी संघाला या स्पर्धेचा इतिहास चांगलाच ठाऊक आहे आणि २००० मध्ये न्यूझीलंड हा या स्पर्धेचा पहिला विजेता ठरला होता, हे देखील माहीत आहे.
कोच पुढे म्हणाले, की 'आमच्याकडे सध्या दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यामुळे निवड निश्चितच आव्हानात्मक झाली आहे. शेवटी, आम्ही त्या संघासोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला जो आम्हाला पाकिस्तान आणि UAE मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय देईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ- मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल्यम ओ'रुर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
संबंधित बातम्या