टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (१ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडने २३५ सर्वबाद केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने ५ तर वॉशिंग्टन सुंदरने ४ विकेट घेतल्या.
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. किवी संघाला चौथ्याच षटकातच पहिला धक्का बसला, जेव्हा डेव्हन कॉनवेला वेगवान गोलंदाज आकाश दीपने पायचीत केले. कॉनवेने ११ चेंडूत केवळ ४ धावा केल्या. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १५/१ होती.
यानंतर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी ४४ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने लॅथमला (२८ धावा) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर सुंदरने रचिन रवींद्रला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. रवींद्र ५ धावा करून सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
येथून डॅरिल मिशेल आणि विल यंग यांच्यात चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी झाली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली. जडेजाने प्रथम विल यंगला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले. यंगने १३८चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या.
त्यानंतर जडेजाने ४५व्या षटकात टॉम ब्लंडनलाही बोल्ड केले, त्याला खातेही उघडता आले नाही. ब्लंडेल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १५९/५ अशी होती. जडेजाने ग्लेन फिलिप्सलाही (१७ धावा) स्वस्तात बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने त्याच षटकात इश सोढी (७ धावा) आणि मॅट हेन्री (०) यांना बाद करत डावातील ५ बळी पूर्ण केले.
जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये १४व्यांदा ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडला नववा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला, जो सुंदरच्या चेंडूवर रोहित शर्माकरवी झेलबाद झाला. मिशेलने १२९ चेंडूत ८२ धावा केल्या. ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. शेवटी सुंदरने एजाज पटेलला (७ धावा) बाद करून किवी संघाचा पहिला डाव संपवला. सुंदरची डावातील ही चौथी विकेट होती.