टी-20 विश्वचषक २०२४ चा ३७ वा सामना सोमवारी (१७ जून) किंग्सटाउन येथे नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. नेपाळचा T20 विश्वचषक २०२४ चा प्रवास पराभवाने संपला. बांगलादेशने कमी धावसंख्येच्या सामन्यात नेपाळचा २१ धावांनी पराभव केला.
मात्र, या टी-20 वर्ल्डकपमध्ये नेपाळच्या चाहत्यांनी वर्चस्व गाजवले. नेपाळ संघाचे चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये पोहोचले होते. त्यांनी आपल्या उपस्थितीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही नेपाळच्या चाहत्यांनी आपल्या अनोख्या सेलिब्रेशनने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३० धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. पॉवरप्लेचे शेवटचे ओव्हर सुरू होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने चौथ्या चेंडूवर तौहीद ह्रदय याला (९) शॉर्ट फाईन लेगवर संदीप लामिछानेच्या हाती झेलबाद केले. लामिछानेने उजवीकडे धाव घेत डाइव्हिंग मारत अप्रतिम झेल घेतला. यानंतर नेपाळी खेळाडूंनी जल्लोष केला.
मात्र, या दरम्यान कॅमेरा नेपाळी चाहत्यांच्या दिशेने वळवण्यात आला. त्यावेळी एका चाहत्याने जल्लोष करत चक्क स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली. क्रिकेट चाहत्यांचा असा जल्लोष यापूर्वी क्वचितच पाहिला असेल. काही क्षणातच नेपाळच्या या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट झाला. ICC ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
टी-20 विश्वचषक २०२४ मधील नेपाळचा हा तिसरा पराभव होता. या विश्वचषक स्पर्धेत नेपाळने ४ सामने खेळले. यातील तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला. तर एक सामना अनिर्णित राहिला.
बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने आपल्या देशाच्या चाहत्यांची माफी मागितली. पौडेल म्हणाला की नेपाळ संघ एकही सामना जिंकू शकला नाही याबद्दल मनापासून खेद वाटतो आणि संघ भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल अशी आशाही व्यक्त केली. या विजयासह बांगलादेश सुपर-८ मध्ये पोहोचला आहे.
संबंधित बातम्या