Nepal friendship cup t20 tri series : आगामी टी-20 वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानला जागतिक क्रिकेटमध्ये पुढे नेल्यानंतर आता बीसीसीआय नेपाळ क्रिकेट संघाला मदत करणार आहे. शेजारील देश नेपाळला आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी बीसीसीआय मदत करणार आहे.
यासाठी BCCI 'फ्रेंडशिप कप' नावाची तिरंगी मालिका आयोजित करणार आहे. या तिरंगी मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
या तिरंगी मालिकेसाठी नेपाळचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात नेपाळचा संघ भारतातील बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या संघांविरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे. या मालिकेत ७ खेळले जातील. मालिकेतील पहिला सामना ३१ मार्चला खेळला जाणार आहे तर अंतिम सामना ७ एप्रिलला होणार आहे. प्रत्येक संघ इतर दोन संघांशी दोनदा सामना करेल आणि अव्वल दोन संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील.
दरम्यान आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये नेपाळ संघाला ग्रुप डी मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड आणि श्रीलंका या संघांचा सामना होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे, या मालिकेचे आयोजन होत असल्याने नेपाळ क्रिकेट बोर्ड प्रचंड खूश असून या तिरंगी मालिकेला म्हणजेच, फ्रेंडशिप चषकाला वार्षिक कार्यक्रम बनवण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. यामुळे दोन क्रिकेट समुदायामध्ये मैत्री आणि खेळाला प्रोत्साहन मिळेल.
३१ मार्च – नेपाळ विरुद्ध गुजरात
१ एप्रिल – गुजरात विरुद्ध बडोदा
२ एप्रिल – नेपाळ विरुद्ध बडोदा
३ एप्रिल – नेपाळ विरुद्ध गुजरात
४ एप्रिल – गुजरात विरुद्ध बडोदा
५ एप्रिल – नेपाळ विरुद्ध बडोदा
७ एप्रिल - अंतिम सामना