हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नेपाळची विजयी मोहीम सुरूच आहे. आधी नेपाळने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. आता नेपाळने ब गटातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी दणका दिला आहे.
६ षटकांच्या या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत २ गडी गमावून १११ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ १०० धावाच करता आल्या. नेपाळने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. लोकेश बाम आणि कर्णधार सुदीप जोरा यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. कर्णधार सुदीप १६ चेंडूत ५१ धावा करून निवृत्त झाला. या खेळीदरम्यान सुदीपने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. लोकेश बामने १३ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. जॅक वुडने त्याची विकेट घेतली.
यानंतर बिबेक यादव ४ चेंडूत १२ धावा काढून जॅक वुडचा दुसरा बळी ठरला. नारायण जोशीने १ चेंडूवर एक धाव घेतली. राशिद खानने २ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. नेपाळने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवत ६ षटकांत १११ धावा केल्या.
नेपाळच्या ११२ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार सॅम हेझलेट २ चेंडूत केवळ एक धाव केली आणि तो प्रॅटिसचा बळी ठरला. डॅन ख्रिश्चनही जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि ५ चेंडूत ९ धावा काढून प्रॅटिसचा दुसरा बळी ठरला. ॲलेक्स रॉस ४ चेंडूत १४ धावांची खेळी खेळून बाद झाला.
एका टोकाला उभ्या असलेल्या जॅक वुडने १६ चेंडूत ५५ धावांची नाबाद खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. फवाद अहमद ४ चेंडूत ८ धावा करून बाद झाला तर अँड्र्यू फेन्केट ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाला ५ गडी गमावून ६ षटकात केवळ १०० धावा करता आल्या. त्यांनी सामना ११ धावांनी गमावला. नेपाळने आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. नेपाळचा हा सलग दुसरा विजय आहे.