Who Is Dipendra Singh Airee : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने कतारविरुद्ध ६ चेंडूत सलग ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. दीपेंदरने सलग ६ चेंडूत ६ षटकार ठोकत भारताच्या युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यात ६ चेंडूत सलग ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम युवराज सिंगने २००७ च्या T20 विश्वचषकात केला होता. युवीने इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार ठोकले होते. त्याचवेळी आता नेपाळी क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरीने अशी कामगिरी केली आहे.
कतारविरुद्ध दीपेंद्र सिंग ऐरीने २१ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत ७ षटकार आणि ३ चौकार लगावले. त्याचबरोबर दीपेंद्र सिंग ऐरी हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग ६ षटकार मारण्याव्यतिरिक्त किमान १ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही.
दीपेंद्र सिंग ऐरीच्या झंझावाती खेळीमुळे नेपाळने २० षटकांत ७ गडी गमावून २१० धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीशिवाय आसिफ शेखने ४१ चेंडूत ५२ धावा केल्या.
दीपेंद्र सिंग ऐरीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने आतापर्यंत ५५ एकदिवसीय सामने आणि ५७ टी-२० सामन्यांमध्ये नेपाळचे प्रतिनिधित्व केले आहे. दीपेंद्र सिंग ऐरीने T20 सामन्यांमध्ये १४९.६४ च्या स्ट्राइक रेटने आणि ३८.७९ च्या सरासरीने १४७४ धावा केल्या आहेत. याशिवाय वनडे फॉरमॅटमध्ये दीपेंद्र सिंग ऐरीच्या नावावर १९.०६ च्या सरासरीने आणि ७१.२२ च्या स्ट्राईक रेटने ८९६ धावा आहेत.
याशिवाय दीपेंद्र सिंग ऐरी हा गोलंदाज म्हणूनही खूप यशस्वी ठरला आहे. या खेळाडूने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३.९१ आणि ३३.३९ च्या सरासरीने ३८ फलंदाजांना बाद केले आहे. तर T20 फॉरमॅटमध्ये त्याने ६.०६ च्या इकॉनॉमी आणि १८.७५ च्या सरासरीने ३२ फलंदाजांना आपला बळी बनवले.