आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) माजी क्रिकेट खेळाडूंचा विशेष सन्मान जाहीर केला आहे. भारताची माजी महिला खेळाडू नीतू डेव्हिड हिला आयसीसीने हॉल ऑफ फेम या किताबाने सन्मानित केले आहे. तिच्यासह ॲलिस्टर कुक आणि एबी डिव्हिलियर्स यांचाही या यादीत समावेश आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांचा आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. हे तीन दिग्गज हा सन्मान मिळवणारे ११३ वे, ११४ वे आणि ११५ वे सदस्य ठरले आहेत. या विशेष प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
नीतू डेव्हिड ही भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक मौल्यवान रत्न आहे. ती डावखुरी फिरकीपटू आहे आणि ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा सन्मान डायना एडुलजी हिला देण्यात आला होता.
नीतू डेव्हिडने १० कसोटी आणि ९७ एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारी पहिली भारतीय महिला आहे. कसोटी सामन्याच्या एका डावात ८ विकेट घेण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे.
संबंधित बातम्या