Sanju Samson Father Samson Viswanath : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याची निवड झालेली नाही. तसेच, होम टीम केरळच्या संघातही त्याचा समावेश झालेला नव्हता.
मात्र, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजूची संघात निवड करण्यात आली आहे. आता या सर्व प्रकरणावर संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ यांनी भावनिक होत एक वक्तव्य केले आहे.
सॅमसन विश्वनाथ यांनी स्पोर्ट्स तकला एक मुलाखत दिली. यात ते बोलत होते. या मुलाखतीदरम्यान त्यांना ढसाढसा रडू कोसळले. संजूच्या वडिलांनी रडत रडत सांगितले की, आपल्या मुलाविरुद्ध कट रचला जात असून तो केरळ क्रिकेट असोसिएशनमध्ये (KCA) सुरक्षित नाही.
वास्तविक, नुकतेच केसीएचे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी संजू सॅमसनवर टीका केली होती आणि म्हटले होते की, कोणीही केरळसाठी त्यांना हवे तेव्हा खेळू शकत नाही. आता सॅमसनच्या वडिलांनी असोसिएशनवर खळबळजनक आरोप केला आहे.
ते म्हणाले, की 'आम्ही केरळ क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात कधीही कोणतेही काम केले नाही. त्यांच्याविरुद्ध आमच्या बाजूने कोणतीही चूक झालेली नाही. मी आणि माझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही. का माहीत नाही, ही फक्त आजची गोष्ट नाही, गेली १०-१२ वर्षे आपण या समस्यांना तोंड देत आहोत.
'यामागे काय कारण आहे, हे कोण करतंय, आम्हाला माहिती नाही. आजही आम्ही असोसिएशनला दोष देत नाही. त्यांनी आम्हाला आणि मुलांना आधार दिला आहे.
संजूचा भाऊही क्रिकेटर होता. माझ्या दोन्ही मुलांनी केरळसाठी चांगली कामगिरी केली. मोठ्या मुलाने केरळसाठी अंडर १९ मध्ये चांगली कामगिरी केली. शिबिरातही चांगली कामगिरी केली होती, पण तरीही एकदिवसीय संघात निवड झाली नव्हती. त्यानंतर अंडर-२५ संघात निवड झाली. आमचा मुलगा चार सामन्यांतून बाहेर फेकला गेला. यानंतर तिथून मला संशय येऊ लागला.
संजूचे वडील पुढे म्हणाले, 'मोठ्या मुलाला पाचव्या सामन्यात संधी मिळाली. तो सलामीवीर नव्हता, पण तरी त्याला सलामीला खेळवले, तो खेळलादेखील. अगदी चांगली कामगिरी केली. पण यानंतर सामन्यादरम्यान मुलगा जखमी झाला.
यानंतर या लोकांनी कधीही त्याचा उल्लेख केला नाही. तेथून आजपर्यंत त्या गोष्टी सुरू आहेत. आम्ही संघटनेच्या विरोधात कधीच काही केले नाही. आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला सांगा, आम्ही माफी मागू.
‘११ वर्षांपूर्वी या लोकांनी मला सांगितले होते की ते सॅमसनला कोणताही सामना पाहण्यासाठी येऊ देणार नाहीत. आम्ही त्याच्यावर बंदी घातली आहे. मी म्हणालो माझ्या मुलाने काही चूक केली तर मला बोलावून घ्या, मी धावत येईन. मुलांच्या करिअरसाठी मी नेहमीच पुढे असतो.
अशा स्थितीत मी कोणावर अन्याय का करू? राजा महाराजांसारख्या लोकांशी मी कशाला पंगा घेईन, माझ्या मुलाचे करिअर बरबाद होईल.’
विजय हजारे ट्रॉफीच्या वादावर संजूचे वडील म्हणाले, 'संजू सॅमसनला अधिकृतपणे असोसिएशनने कोणतेही उत्तर दिले नव्हते. संजू असाच इथपर्यंत पोहोचला नाही. कठोर परिश्रम करून इथवर आला आहे. त्याने आतापर्यंतचे संपूर्ण आयुष्य मैदानावर घालवले आहे. मला दीड महिन्यापूर्वी कळले होते की संजूच्या विरोधात असोसिएशनमध्ये एक प्लॅन आखण्यात आला होता.
विश्वनाथ पुढे म्हणाले, 'त्याच्याविरुद्ध अशा गोष्टी केल्या गेल्या की तो निघून गेला. आम्ही त्यांच्याशी वाद घालू शकत नाही. मला वाटते की माझे मूल येथे सुरक्षित नाही.
हे लोक माझ्या मुलावर काहीही आरोप करतील आणि लोक त्यावर विश्वास ठेवतील. कोणत्याही राज्याने संजूला खेळायला बोलावले तर माझ्या मुलाने केरळसाठी क्रिकेट खेळणे सोडून तिकडे जावे असे मला वाटते. माझे मूल येथे सुरक्षित नाही.
संजूचे वडील पुढे म्हणाले, 'हे लोक कधीही माझ्या मुलाविरुद्ध कट रचू शकतात. मला याची भीती वाटते. आम्ही कधीही कोणावर अन्याय केलेला नाही. माझ्या मुलाने कधीच मैदान सोडले नाही, तो कधीच मैदानाबाहेर राहिला नाही. पण त्याच्यासोबत असे घडत राहिले. मी आता त्यांना कंटाळलो आहे. मी माझ्या मुलांना येथून बाहेर काढणार आहे. माझी विनंती आहे की, कोणत्याही संघटनेने माझ्या मुलांना संधी दिली तर मी केरळ सोडेन. मला भीती वाटत आहे की, हे लोक माझ्या मुलाची बदनामी करतील."
संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळणे हा मोठा धक्का आहे कारण तो या फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करत होता. संजू सॅमसनने टीम इंडियासाठी आतापर्यंत १४ एकदिवसीय डावांमध्ये ५६ पेक्षा जास्त सरासरीने ५१० धावा केल्या आहेत. सॅमसनने एक शतक आणि ३ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही १०० च्या आसपास आहे.
संबंधित बातम्या