U19 World Cup 2024, Player Of The Tournament : अंडर-१९ वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (११ फेब्रुवारी) रंगणार आहे. १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये १६ संघांनी भाग घेतला होता.
वर्ल्डकपमधील बहुतेक सामने अतिशय रोमहर्षक झाले. याचा अर्थ या स्पर्धेतील प्रत्येक संघाने आणि संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. आता फायनलपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी कोणते खेळाडू शर्यतीत आहेत, याची यादी जाहीर केली आहे.
अंडर १९ वर्ल्डकप २०२४ मध्ये ८ खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे या आठपैकी तीन खेळाडू भारतीय आहेत.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीत तीन भारतीय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. कर्णधार उदय सहारन, फिरकी गोलंदाज आणि उपकर्णधार सौम्य पांडे आणि मुशीर खान हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीत आहेत.
सौम्या पांडेने स्पर्धेत भारताच्या खूपच प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने धावा रोखण्याचे काम केले. कितीही छोटे लक्ष्य असले तरी त्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर विरोधी संघाच्या फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. सौम्य पांडेने या वर्ल्डकपमध्ये २.४४ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.
अष्टपैलू मुशीर खान हा या स्पर्धेत दोन शतके करणारा एकमेव खेळाडू आहे, मुशीरने न्यूझीलंडविरुद्ध १३१ धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेव्यतिरिक्त, मुशीरने त्याच्या डाव्या हाताच्या फिरकीने महत्त्वपूर्ण विकेट्स देखील घेतल्या आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने ८१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. याशिवाय नेपाळविरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात त्याने शतक झळकावले होते.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या नावांमध्ये पाकिस्तानच्या उबेद शाहचाही समावेश आहे. उबेद हा नसीम शाहचा धाकटा भाऊ आहे. उबेदने या स्पर्धेत त्याच्या वेगाने फलंदाजांना खूप त्रास दिला.
यानंतर डावखुरा रबाडा म्हणून ओळखला जाणारा क्वेना माफाकाही प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीत आहे. तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
क्वेना माफाका (दक्षिण आफ्रिका)
उबेद शाह (पाकिस्तान)
सौम्या पांडे (भारत)
मुशीर खान (भारत)
ज्वेल अँड्र्यू (वेस्ट इंडीज)
ह्यू वेबगेन (ऑस्ट्रेलिया)
उदय सहारन (भारत)
स्टीव्ह स्टोक (दक्षिण आफ्रिका)