मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus U19 WC Final : भारत आज बदला घेणार? टीम इंडियाचे हे ५ शिलेदार करणार कांगारूंची शिकार

Ind vs Aus U19 WC Final : भारत आज बदला घेणार? टीम इंडियाचे हे ५ शिलेदार करणार कांगारूंची शिकार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 11, 2024 11:11 AM IST

U19 World Cup Final, Ind vs Aus : आजच्या सामन्यात चाहत्यांच्या नजरा भारताच्या ५ खेळाडूंवर असणार आहेत. या खेळाडूंनी या वर्ल्डकपमध्ये अतिशय दमदार कामगिरी केली आहे.

U19 World Cup Final, Ind vs Aus
U19 World Cup Final, Ind vs Aus

अंडर-१९ विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत दोनदा अंडर-१९ वर्ल्डकपची फायनल झाली आहे. त्या दोन्ही वेळा भारताने बाजी मारली होती.

दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा प्रमुख ५ खेळाडूंवर असणार आहेत. या खेळाडूंनी या वर्ल्डकपमध्ये अतिशय दमदार कामगिरी केली आहे.

बदला घेण्यास ज्यूनियर टीम इंडिया सज्ज

तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्षभरात तिसऱ्यांदा आयसीसी इव्हेंटचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या दोन फायनलमध्ये (WTC आणि वनडे वर्ल्डकप) भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पण आता वनडे वर्ल्डकप फायनलच्या ८४ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाकडून बदला घेण्यीच संधी आली आहे.  या विश्वचषकात ज्युनियर टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत WTC फायनल आणि वनडे वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची ही सुवर्ण संधी आहे.

मुशीर खान

मुशीर खानने या अंडर-१९ विश्वचषकामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मुशीर दुसऱ्या स्थानावर आहे. मुशीरने ६ डावात ६७.७० च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.

सचिन धस

फिनीशर सचिन धस स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने ६ सामन्यांच्या ६ डावात ७३.५० च्या सरासरीने २९४ धावा केल्या आहेत. त्याने एक शतकही ठोकले आहे. 

उदय सहारन

टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारन या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल आहे. उदयने ६ सामन्यात ६४.८३ च्या सरासरीने ३८९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने तीन अर्धशतके आणि एक शतकही झळकावले आहे. 

सौम्य पांडे

या वर्ल्डकपमध्ये भारताच्या गोलंदाजांनीही कमाल केली आहे. फिरकी गोलंदाज सौम्य पांडेने ६ सामन्यात एकूण १७  विकेट घेतल्या आहेत. सौम्या सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत फायनलमध्येही सौम्य पांडे एक्स फॅक्टर ठरू शकतो.

नमन तिवारी

सौम्य पांडेसह नमन तिवारीही फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो बनू शकतो. नमनने गोलंदाजीत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याने स्पर्धेतील ५ सामन्यात १० बळी घेतले आहेत. 

WhatsApp channel