मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U19 World Cup Final : ८ वर्षांचा असताना युवराज सिंगची विकेट काढली, मुशीर खान आता कांगारूंना दाखवणार हिसका

U19 World Cup Final : ८ वर्षांचा असताना युवराज सिंगची विकेट काढली, मुशीर खान आता कांगारूंना दाखवणार हिसका

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 10, 2024 10:42 PM IST

Musheer Khan U19 World Cup 2024 : या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा मुशीर खानवर असणार आहेत. कारण मुशीर खानने या वर्ल्डकपमध्ये अतिशय दमदार कामगिरी केली आहे.

Musheer Khan U19 World Cup
Musheer Khan U19 World Cup

अंडर-१९ विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा मुशीर खानवर असणार आहेत. कारण मुशीर खानने या वर्ल्डकपमध्ये अतिशय दमदार कामगिरी केली आहे.

मुशीर खान या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे मुशीरच्या घरात सर्वजण क्रिकेटर आहेत. त्याचा मोठा भाऊ सरफराज खान टीम इंडियात पोहोचला आहे. तर त्याचे वडीलही क्रिकेट कोचिंग करतात.

दरम्यान, मुशीर खानने वयाच्या आठव्या वर्षी टीम इंडियाचा स्टार फलंदाज युवराज सिंगला बाद केले होते. 

मुशीरने युवराजला बाद करून प्रसिद्धी मिळवली

मुशीरच्या घरात फार पूर्वीपासून क्रिकेटचे वातावरण आहे. अशा स्थितीत मुशीरला लहानपणापासूनच क्रिकेटची गोडी लागली. 

मुशीर आणि सरफराज या दोघांनाही त्याच्या वडिलांनी ट्रेन केले आहे. विशेष म्हणजे, एका मैत्रीपूर्ण सामन्यात मुशीर खानने युवराज सिंगला बाद केले होते. युवीची विकेट घेतल्यानंतर ८ वर्षांचा मुशीर खान तेव्हा चांगलाच चर्चेत आला होता.

मुशीर खानची अंडर १९ वर्ल्डकपमधील कामगिरी

मुशीरने चालू अंडर १९ वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आयर्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली. मुशीरने आयर्लंडविरुद्ध ११८ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध १३१ धावा केल्या होत्या. 

सोबतच मुशीरने अमेरिकेविरुद्ध ७३ धावांची खेळी केली होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मुशीरने ६ सामन्यात ३३८ धावा केल्या आहेत. आता तो अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.

मुशीरचे वडीलच त्याचे पहिले प्रशिक्षक 

मुशीर, मोईन आणि सरफराज यांना त्यांचे वडील नौशाद खान यांनीच ट्रेनिंग दिली आहे. तेच त्यांचे सुरुवातीपासूनचे कोच आहेत.

नौशाद खान हे मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगडचे आहेत. पण मुलांना क्रिकेटर बनवण्यासाठी नौशाद खान मुंबईत आले. येथे त्यांनी आपल्या मुलांना प्रशिक्षण दिले.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi