मुंबईचा युवा खेळाडू मुशीर खान शुक्रवारी (२७ सप्टेंबर) एका कार अपघातात जखमी झाला होता. या अपघातामुळे तो १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही.
पण आता मुशीर खान याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या गळ्यात पट्टा बांधलेला दिसत आहे. यात तो त्याच्या तब्येतीची माहिती देत आहे. तसेच, मदत केलेल्यांचे आभार मानत आहे.
मुशीरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आभार मानले आणि चाहत्यांचे आभारही मानले.
सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर त्याचे वडील नौशाद खान यांच्यासोबत लखनऊला जात होता. तेथे मुंबई आणि शेष भारत यांच्यात इराणी चषक सामना खेळवला जाणार आहे. या लखनौला जात असताना पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कार दुभाजकावर आदळली.
या अपघातात मुशीर खानची मान फ्रॅक्चर झाली असून वडिलांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुशीर खान आणि त्याचे वडील काय म्हणाले?
या व्हिडीओत मुशीरचे वडील नौशाद खान म्हणाले, की "सर्वप्रथम मी या नवीन आयुष्यासाठी माझ्या देवाचे आभार मानतो. यासोबतच माझ्या प्रियजनांचे आणि आमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्या सर्व नातेवाईकांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. काळजी घेण्यासाठी एमसीएचे आणि बीसीसीआयचे खूप खूप आभार. मी एवढेच म्हणेन की, जे मिळाले त्याबद्दल आभार मानावे आणि जे मिळाले नाही त्यासाठी धीर धरावा.”
यानंतर मुशीर खान म्हणाला, “मी आता ठीक आहे आणि माझे वडीलही ठीक आहेत. आता सर्वांच्या प्रार्थनेबद्दल खूप खूप धन्यवाद."
मुशीर खानच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे. एमसीएच्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की मुशीर प्रवासासाठी योग्य होताच, त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले जाईल. मानेच्या या दुखापतीमुळे मुशीर खानला जवळपास ३ महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते.