Mumbai vs Baroda ranji trophy quarter final : सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. यातील मुंबई आणि बडोदा यांच्यातील सामन्यात सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानने शानदार कामगिरी केली आहे. मुशीर रणजी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळत आहे. केवळ चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने धमाकेदार खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुंबई आणि बडोदा यांच्यातील उपांत्यपूर्व सामना मुंबईत खेळवला जात आहे. आज (२४ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात १८ वर्षीय मुशीर खानने द्विशतक झळकावले आहे. अंडर-१९ विश्वचषकात टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानने या सामन्यात महत्त्वाच्या वेळी हे द्विशतक झळकावले आहे. मुंबईचा निम्मा संघ केवळ १४२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा परिस्थितीत मुशीर खानने २५७ चेंडूत २०३ धावा करत संघाची धावसंख्या ३८४ पर्यंत नेली. या खेळीत त्याने १८ चौकार मारले.
खेळाच्या पहिल्या दिवशी मुशीर खानने शतक झळकावले होते. दुसऱ्या दिवशी त्याने आपली लय कायम ठेवत शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. त्याचवेळी त्याने सहाव्या विकेटसाठी हार्दिक तमोरसोबत १८१ धावांची भागीदारीही केली. या भागीदारीमुळेच मुंबई संघाने या सामन्यात पुनरागमन केले. हार्दिक तामोरेने २४८ चेंडूंचा सामना करत ५७ धावा केल्या.
मुशीर खानने अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये ६०च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्याने ७ सामन्यात ३६० धावा केल्या होत्या. मुशीर खानने २ शतके आणि १ अर्धशतक झळकावले होते. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३१ धावा होती.