भारताची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी सुरू झाली आहे. आज गुरुवारी (५ सप्टेंबर) पहिल्या दिवशी भारत अ आणि भारत ब संघ आमनेसामने आहेत. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत ब संघाची सुरुवात चांगली झाली नाही.
भारत-ब संंघाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. पण मुशीर खान याने मात्र, एक टोक सांभाळून दमदार फलंदाजी केली. त्याने जबरदस्त शतकी खेळी केली.
एकवेळ भारत-ब संघाचे ७ फलंदाज ९४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र त्यानंतर मुशीर खान आणि नवदीप सैनी यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. मुशीर खान आणि नवदीप सैनी यांच्यात आतापर्यंत १०३ धावांची भागीदारी झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ब संघाने ७ बाद २०२ धावा केल्या होत्या.
सध्या मुशीर खान २२७ चेंडूत १०५ धावा करून नाबाद परतला आहे. तर नवदीप सैनीने ७४ चेंडूत २९ धावा करून नाबाद आहे. मुशीर खानने १० चौकार आणि २ षटकार मारले. तर नवदीप सैनीने ३ चौकार आणि १ षटकार लगावला.
दरम्यान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मुशीर खानने शतक झळकावून निवड समितीचे टेन्शन वाढवले आहे. मुशीर खानचा भाऊ सरफराज खान याने भारताकडून कसोटी पदार्पण केले आहे. पण या सामन्यात सरफराज पूर्णपणे फ्लॉप झाला. तो ३५ चेंडूत ९ धावा करून बाद झाला.
तत्पूर्वी, भारत-अ आणि भारत अ संघ बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. भारत-अ चा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारत ब संघाला पहिला धक्का ३३ धावांवर बसला. जेव्हा अभिमन्यू ईश्वरन ४२ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वालने ५९ चेंडूत ३० धावा केल्या.
सरफराज खान केवळ ९ धावांचे योगदान देऊ शकला. तर ऋषभ पंत ७ धावा करून बाद झाला. याशिवाय नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि साई किशोर यांसारखे फलंदाज आपली छाप सोडू शकले नाहीत.