Ranji Trophy : मुशीर खानने मोडला सचिन तेंडुलकरचा रणजी ट्रॉफीतील २८ वर्षे जुना विक्रम-musheer khan breaks sachin tendulkar ranji record in front of him with century ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : मुशीर खानने मोडला सचिन तेंडुलकरचा रणजी ट्रॉफीतील २८ वर्षे जुना विक्रम

Ranji Trophy : मुशीर खानने मोडला सचिन तेंडुलकरचा रणजी ट्रॉफीतील २८ वर्षे जुना विक्रम

Mar 12, 2024 03:00 PM IST

Musheer Khan in Ranji Trophy : रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावत मुशीर खान यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा एक जुना विक्रम मोडला आहे.

मुशीर खानने मोडला सचिन तेंडुलकरचा 'रणजी'तील विक्रम
मुशीर खानने मोडला सचिन तेंडुलकरचा 'रणजी'तील विक्रम (PTI-Screengrab)

Ranji Trophy Final : मुंबईचा फलंदाज मुशीर खान (Musheer Khan) हा रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा आतापर्यंतचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्यानं विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

१९९४-९५ च्या मोसमातील अंतिम सामन्यात सचिननं पंजाबविरुद्ध दोन शतकं झळकावली होती. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण मुंबईकर ठरला होता. त्याचा हा विक्रम तीन दशके कायम होता. मुशीर खाननं आज तो मोडला. मुशीरनं वयाच्या १९ व्या वर्षी (१९ वर्षे १४ दिवस) हा विक्रम मोडीत काढला. नुकतंच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सरफराज खान (Sarfaraz Khan) हा मुशीरचा मोठा भाऊ आहे.

पॅडवरील क्लिप काढून मुशीरनं त्याचं शतक पूर्ण केलं. मुंबईला दोनदा रणजी करंडक जिंकून देणारा तेंडुलकर त्यावेळी स्वत: वानखेडेवर उपस्थित होता. मुशीरच्या शतकाच्या बळावर विदर्भाविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यावर मुंबईनं आपली पकड मजबूत केली आहे.

५१ धावांच्या धावसंख्येवर डाव पुढं सुरू करणाऱ्या मुशीरनं आपलं दुसरं प्रथम श्रेणी शतक पूर्ण केलं. उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध त्यानं पहिलं द्विशतक झळकावलं होतं. तिसऱ्या दिवशी खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा मुशीरनं कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत फलंदाजीला सुरुवात केली आणि दोघांनी धावांचा वर्षाव सुरूच ठेवला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ११९ धावांची आघाडी असलेल्या मुंबईनं ७३ धावांवर कर्णधाराची विकेट गमावली. तेव्हा मुंबईच्या नावावर १६४ धावा होत्या. पुढं श्रेयस अय्यरच्या साथीनं मुशीरनं मुंबईला मजबूत स्थितीत नेलं.

मुशीर आणि अय्यर यांनी २५६ चेंडूत १६८ धावांची भागीदारी केली. शतकासाठी पाच धावा कमी असलेल्या श्रेयस अय्यरनं आदित्य ठाकरेच्या चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, टायमिंग चुकल्यामुळं तो बाद झाला.

मुशीर फॉर्मात

मुशीर मागील काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ६० च्या सरासरीनं ३६० धावा करत त्यानं दोन शतकं आणि एका अर्धशतकासह दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.