मुंबईचा युवा खेळाडू मुशीर खान याचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) लखनौच्या बाहेर रस्ता अपघात झाला. मुशीर इराणी चषकाच्या सामन्यासाठी आझमगड येथील त्याच्या घरून लखनऊला जात होता. त्यावेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ईराणी चषकाचा सामना १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, लखनौ पोलिसांच्या वाहतूक संचालनालयाच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, मुशीर त्याच्या वडिलांसह आणि इतर दोघांसोबत प्रवास करत होता. त्यांची टोयोटा फॉर्च्युनर गाडी दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातात मुशीर याच्या मानेला दुखापत झाली असून त्याच्यावर लखनौ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेदांता हॉस्पिटलने मुशीर खानच्या तब्येतीचे अपडेट शेअर केले आहे. मेदांताने मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे, की २७.०९.२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता, पूर्वांचल एक्सप्रेसवेवर रस्ता अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू मुशीर खान याला मानेच्या दुखापतीमुळे मेदांता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले.
ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉ. धर्मेंद्र सिंग यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मुशीर खानला लवकरात लवकर मुंबईला नेण्यात येईल. तेथे, पुढील उपचारांसाठी बीसीसीआय अधिकृत रुग्णालयात त्याची तपासणी केली जाईल. बीसीसीआय आणि एनसीएच्या वैद्यकीय समितीला त्याच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे.
मुशीर इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळणार होता. यानंतर तो रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबईकडून खेळणार होता. इराणी चषकानंतर मुंबईचा संघ ११ ऑक्टोबरपासून बडोद्याविरुद्धच्या सामन्याने रणजी मोहिमेला सुरुवात करेल.
मुशीर खानबद्दल सांगायचे तर, त्याने अलीकडेच दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये भाग घेतला होता. भारत ब संघाकडून पहिल्याच सामन्यात त्याने १८१ धावांची खेळी केली. त्याआधी मुशीरने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही शतक झळकावले होते.