रणजी ट्रॉफी २०२३-२४ चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने विदर्भसमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने चौथ्या दिवसअखेर (१३ मार्च) ५ बाद २४८ धावा केल्या आहेत. त्यांना आणखी २९० धावा करायच्या आहेत. पण पाचव्या दिवशी फिरकीपटूंना खेळणे विदर्भासाठी सोपे असणार नाही.
अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी विदर्भाने बिनबाद १० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाला पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने ६४ धावांवर बसला. ३२ धावा करून अथर्व तायडे शम्स मुलाणीचा बळी ठरला. यानंतर ध्रुव शौरेही २८ धावा करून बाद झाला. त्याचवेळी क्रिझवर सेट झाल्यानंतर अमन मोखाडे ३२ धावा करून बाद झाला. यश राठोडला फलंदाजीत विशेष काही कराता आले नाही आणि केवळ ७ धावा केल्या.
१३३ धावांवर ४ गडी गमावून अडचणीत सापडलेल्या विदर्भाचा डाव करुण नायर आणि अक्षय वाडकरने सांभाळला. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. ७४ धावांची शानदार खेळी करत करुण मुशीर खानचा बळी ठरला. अक्षय ५६ धावा करून क्रीजवर आहे, तर हर्ष दुबे ११ धावा करून त्याला साथ देत आहे.
फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर मुशीर खाननेही गोलंदाजीतही कमाल केली. मुशीरने करुण आणि अक्षयची ९० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. यासोबतच त्याने अमन मोखाडेलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईकडून तनुष कोटियननेही २ विकेट्स घेतल्या. विदर्भाला रणजी फायनल जिंकण्यासाठी आणखी २९० धावा करायच्या असून संघाच्या ५ विकेट शिल्लक आहेत.