Mumbai vs Haryana Ranji Trophy Quarterfinal : रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाने गतविजेत्या मुंबईची अवस्था दयनीय केली आहे. हा बाद फेरीचा सामना आज ८ फेब्रुवारीपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू झाला आहे, ज्यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा हा निर्णय खूपच वाईट ठरला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत मुंबईची अवस्था ७ बाद ११३ अशी आहे. हे वृत्त लिहिपर्यंत तनुष कोटीयन आणि शम्स मुलानी फलंदाजी करत होते.
हरियाणाच्या अंशुल कंबोजच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज झुंजताना दिसले. मुंबई संघाची सुरुवात इतकी खराब झाली की संघाचे तीनही आघाडीचे फलंदाज १४ धावांनंतर पॅव्हेलियनमध्ये परतले आणि तिघेही क्लीन बोल्ड झाले.
अजिंक्य रहाणेने काही काळ एक टोक रोखून धरले, पण सुमित कुमारने त्याला ३१ धावांवर क्लीन बोल्ड केले. २५ धावा होईपर्यंत मुंबई संघाने ४ विकेट गमावल्या होत्या.
यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्यात ४० धावांची छोटी पण महत्त्वाची भागीदारी झाली. पण दुबेही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि २८ धावा करून बाद झाला.
९४ धावांपर्यंत मुंबई संघाने ६ विकेट गमावल्या आहेत. भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मुंबईकडून खेळत आहे, परंतु त्याचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. सूर्या केवळ ९ धावा करून बाद झाला.
मुंबईचा संघ या रणजी ट्रॉफीमध्ये गतविजेता म्हणून उतरला आहे, गेल्या मोसमात मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव करून ४२व्यांदा रणजी करंडक जिंकला होता.
इतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, जम्मू-काश्मीरचा सामना केरळशी, तामिळनाडूचा सामना विदर्भाशी आणि सौराष्ट्रचा सामना गुजरातशी होत आहे. मुंबई आणि हरियाणाचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जात आहे.
मुंबई- आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस.
हरियाणा- लक्ष्य दलाल, यशवर्धन दलाल, अंकित कुमार (कर्णधार), हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (विकेटकीपर), जयंत यादव, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अनुज ठकराल, अजित चहल.
संबंधित बातम्या