मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे ऐतिहासिक आहे. पण वानखेडे स्टेडियम हे प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने खूपच लहान आहे. अशा स्थितीत आता मुंबईत नवे स्टेडियम बांधण्याचा विचार सुरू आहे. नवीन स्टेडियम वानखेडेपेक्षा ४ पट मोठे असेल, म्हणजेच नवीन स्टेडियमची आसनक्षमता वानखेडेपेक्षा जवळपास ४ पटीने जास्त असेल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन स्टेडियमबद्दल वक्तव्य केले. दरम्यान मुंबई शहरात आधीच ३ मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम आहेत.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप २०२४ चे विजेतेपद पटकावले. चॅम्पियन टीम इंडियाने बार्बाडोसहून परतल्यानंतर मुंबईत ओपन बसने विजयी परेडही काढली. या विजयानंतर आणि परेडनंतर टीम इंडियाचे मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांना महाराष्ट्र विधानसभेत आमंत्रित करण्यात आले होते. रोहित शर्माने विधानसभेत मराठीत भाषण केले.
याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या स्टेडियमबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुंबईला आता आधुनिक स्टेडियमची गरज आहे. एक स्टेडियम जिथे अधिक प्रेक्षक बसू शकतात.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुंबईला आता वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची गरज आहे. मला माहित आहे की वानखेडे हे ऐतिहासिक स्टेडियम आहे पण आता मुंबईला १ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षख क्षमतेच्या नवीन स्टेडियमची गरज आहे आणि आम्ही भविष्यात ते तयार करण्याचा प्रयत्न करू." मात्र, नवीन स्टेडियमच्या बांधकामाबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
वानखेडे स्टेडियम १९७४ मध्ये बांधण्यात आले होते. या स्टेडियममध्ये अंदाजे ३२,००० लोक बसण्याची क्षमता आहे. हे तेच ऐतिहासिक मैदान आहे, जिथे टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाची फायनल जिंकली होती. धोनीने या मैदानावर षटकार मारून २०११ च्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी उचलली होती.
संबंधित बातम्या