मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  हार्दिक पंड्यानं चाखली विजयाची चव, मुंबई इंडियन्सच्या बुमराह-कोएत्झीने उडवला दिल्लीचा धुव्वा

हार्दिक पंड्यानं चाखली विजयाची चव, मुंबई इंडियन्सच्या बुमराह-कोएत्झीने उडवला दिल्लीचा धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 07, 2024 07:23 PM IST

MI vs DC IPL 2024 Highlights : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मधील पहिला विजय मिळवला आहे. आयपीएल २०२४ च्या २०व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव केला.

MI vs DC IPL 2024 Highlights
MI vs DC IPL 2024 Highlights (AFP)

MI vs DC IPL 2024 Scorecard :  इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या (IPL 2024) २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव केला आहे. रविवारी (७ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला. २३५ धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीला ८ बाद २०८ धावाच करता आल्या.

ट्रेंडिंग न्यूज

चालू मोसमातील म्हणजेच आयपीएल २०२४ मधील मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे. याआधी मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले होते. दिल्ली कॅपिटल्सचा ५ सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला.

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सातत्याने विकेट पडल्यामुळे रिक्वायर्ड रेटही वाढत राहिला, त्यामुळे दिल्लीचे काम कठीण झाले. 

स्टब्सने आपल्या खेळीत ७ षटकार आणि ३ चौकार लगावले. सलामीवीर पृथ्वी शॉनेही ६६ धावांची खेळी खेळली. 

तर जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी अतिशय धारदार गोलंदाजी केली. बुमराहने २२ धावांत २ विकेट घेतल्या. मात्र, जेराल्ड कोएत्झी हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने ४  विकेट मिळवल्या.

मुंबईचा डाव

प्रथम फलंदाजीस आलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा (४९) आणि इशान किशन (४२) यांनी पहिल्या विकेटसाठी ७ षटकात ८० धावांची भागिदारी केली.

यानंतर टीम डेव्हिडने २१ चेंडूंत ४ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद ४५ धावा केल्या. शेवटी आलेल्या रोमारियो शेफर्डने १० चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. शेफर्डने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार मारले.

डावाचे शेवटचे षटक एनरिक नॉर्खियाने टाकले. या षटकात शेफर्डने एकूण ३२ धावा केल्या. डेव्हिड आणि शेफर्ड या दोघांनी १३ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली.

मुंबईने शेवटच्या ५ षटकांत एक गडी गमावून ९६ धावांचा पाऊस पाडला. वानखेडेतील ही मुंबईतील सर्वोच्च धावसंख्या आहे. नॉर्खियाने ४ षटकांत दोन बळी घेत ६५ धावा दिल्या. 

IPL_Entry_Point