महिला प्रीमियर लीग २०२४ ला दणक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला विजयासाठी ५ धावांची गरज होती. अशा स्थितीत एस संजना हिने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, WPL 2024 चा पहिला सामना आज (२३ फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दिल्ली प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मंबईने २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत लक्ष्य गाठले.
१७१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने शानदार फलंदाजी केली. त्यांच्याकडून सलामीची फलंदाज यास्तिका भाटियाने चमकदार कामगिरी केली. तिने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्याचवेळी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ५५ धावा करण्यात यशस्वी ठरली. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ती झेलबाद झाली.
शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. यातील तिने ७ धावा केल्या होत्या. पण पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात ती झेलबाद झाली. शेवटचे षटक फिरकी गोलंदाजी एलिस कॅप्सीने टाकले.
हरमनप्रीतन बाद झाल्यानंतर फलंदाजीला एस संजना आली. केरळच्या या फलंदाजाने २० व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात ५ बाद १७१ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स सुरुवात खराब आणि खूपच संथ झाली होती. पण त्यानंतर त्यांनी वेगाने धावसंख्या वाढवली. त्यांच्याकडून ॲलिस कॅप्सीने ७५ धावांची शानदार खेळी केली.
यानंतर कॅप्टन लॅनिंगने ३१ धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने ४२ धावा आणि मारिझान कॅपने १६ धावा केल्या. तर मुंबईकडून नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. याशिवाय शबनिम इस्माईलला एक विकेट मिळाला.