WPL 2025 2nd Match MI W vs DC W : महिला प्रीमियर लीग २०२५ चा दुसरा सामना आज (१५ फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. शनिवारी मुंबई आणि दिल्लीचे संघ वडोदरा येथील कोटंम्बी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स महिला संघाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. या संघाने एकदा WPLचे विजेतेपदही पटकावले आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स महिला संघात अनेक बलाढ्य खेळाडू आहेत. दिल्लीचीही एकूण कामगिरी चांगली आहे.
मेग लॅनिंग हिच्या नेतृत्वाखालील टीम दिल्लीने गेल्या दोन मोसमात अप्रतिम कामगिरी केली आहे. दिल्ली दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचली आहे. पण दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत या मोसमातील पहिला सामना मुंबईसाठी सोपा असणार नाही. दिल्लीची कर्णधार लॅनिंगसोबतच शफाली वर्माही स्फोटक फलंदाजीत माहिर आहे.
लॅनिंग आणि शफाली यांच्यात आतापर्यंत १८ सामन्यात ८६८ धावांची भागीदारी झाली आहे. या दोघींच्या नावावर भागीदारीचा रेकॉर्डही आहे. लॅनिंग आणि शफाली यांनी महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या दोघींनी एका सामन्यात १६२ धावांची भागीदारी केली होती.
शफाली गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर पडली आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने चमकदार कामगिरी केली. आता ती मुंबईविरुद्ध कशी कामगिरी करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबईतही हरमनप्रीतसह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. संघाने विजेतेपदही पटकावले आहे. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर मुंबई यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूजला सलामीची संधी देऊ शकते. नॅताली सीव्हरची निवड जवळपास निश्चित आहे. सजना सजीवन आणि अमनजोत कौर यांनाही संधी मिळू शकते.
दिल्ली कॅपिटल्स महिला: शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिजन कॅप, नंदिनी कश्यप (विकेटकीपर), जेस जोनासेन, मिन्नू मणी, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
मुंबई इंडियन्स महिला: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सीव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, एस सजना, अमनजोत कौर, अक्षिता माहेश्वरी, एसबी कीर्तना, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
संबंधित बातम्या