Mumbai Indians Oval Invincibles The Hundred League : इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा परिवार दिवसेंदिवस मोठा होत आहे. IPL नंतर, मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिका टी-20, अमेरिका आणि यूएईमधील क्रिकेट लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. पण आता मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या लीग क्रिकेटमध्येही एन्ट्री केली आहे.
मुंबई इंडियन्सने ECB च्या द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेतील संघ ओव्हल इन्व्हिन्सिबल्स या संघाचा निम्मा हिस्सा विकत घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघाचा ४९ टक्के हिस्सा विकत घेतला आहे.
Oval Invincibles चे सध्याचे सांघिक मूल्य सुमारे १२३ दशलक्ष पौंड आहे. या संघातील हिस्सेदारीसाठी मुंबई इंडियन्सला ६० दशलक्ष पौंड द्यावे लागतील, जे भारतीय चलनात सुमारे ६५० कोटी रुपये आहे.
आयपीएलमधील मुंबई इंडियन्सप्रमाणेच ओव्हल इन्व्हिन्सिबल्स हा संघही द हंड्रेडमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने २०२३ आणि २०२४ मध्ये विजेतेपद पटकावले होते.
ओव्हल इन्व्हिन्सिबल्स हा मुंबई इंडिन्सचा ६ वा संघ असेल. याआधी मुंबई इंडियन्सने IPL आणि WPL मध्ये झेंडा फडकावला आहे. तर मेजर लीग क्रिकेटमधील MI न्यूयॉर्क, SA20 मधील MI केप टाउन आणि ILT20 मधील MI Emirates हे संघ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आहेत.
द हंड्रेड्स ओव्हल इनव्हिन्सिबल्समध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि काऊंटी क्लब टीम सरे यांची हिस्सेदारी आहे. ईसीबीने आता आपला हिस्सा मुंबई इंडियन्सला विकला आहे. अशा स्थितीत सरे आणि मुंबई मिळून ओव्हल इनव्हिन्सिबल्सचा संघ चालवणार आहेत.
सरे हा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत काउंटी क्लब आहे. तर मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात शक्तिशाली संघ आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही पॉवरहाऊस एकत्रितपणे ओव्हल इनव्हिन्सिबल्स चालवतील.
त्याचवेळी, ईसीबीने सरेला स्वातंत्र्य दिले आहे की, जर त्यांना हवे असेल तर ते आपला हिस्सा मुंबई इंडियन्सला विकू शकतात.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २०२१ मध्ये द हंड्रेड लीग लॉन्च केली होती. या स्पर्धेत १००-१०० चेंडूंचे दोन डाव खेळले जातात. लीगमध्ये एकूण ८ संघ आहेत. हे सर्व ८ संघ इंग्लंडच्या काउंटी क्लब संघांच्या मालकीचे आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची सर्व संघांमध्ये ४९ टक्के भागीदारी आहे, तर ५१ टक्के क्लब मालकांची आहे.
संबंधित बातम्या