mumbai indians new jersy : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७ व्या मोसमामाला सुरुवात होण्यास आता केवळ ८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आयपीएलचा पहिला सामना (२२ मार्च) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातसामना खेळला जाईल.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ साठी आपली नवीन जर्सी लाँच (mumbai indians jersey 2024) केली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार बदलामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता जर्सी लाँचनंतरही मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेत आला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. मुंबईने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले आणि त्यानंतर काही दिवसांनी तो संघाचा नवा कर्णधार असल्याची घोषणा केली.
आता कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या संघाच्या प्रत्येक कामात आघाडीवर असले पाहिजे, पण जर्सी लाँचमध्ये तसे झाले नाही.
मुंबई इंडियन्सने जर्सी लॉन्चचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मुंबईच्या नवीन जर्सीची पहिली झलक दिसत आहे. त्यानंतर संपूर्ण जर्सी रीलीज होते. यानंतर व्हिडीओत रोहित शर्मा जर्सी परिधान करताना दिसत आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू दिसतात. अशाप्रकारे हार्दिक पांड्या व्हिडीओत ८व्या नंबरला जर्सी परिधान करताना दिसत आहे.
यानंतर आता चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी हार्दिक पंड्यासोबत मोठा गेम झाल्याचे म्हटले आहे.
चाहत्यांच्या मते, कर्णधार या नात्याने हार्दिक पांड्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी असायला हवा होता, पण तसे झाले नाही. व्हिडीओत सर्वप्रथम माजी कर्णधार रोहित शर्माला दाखवण्यात आले.
मात्र, यामागे मुंबई इंडियन्सचा नेमका काय विचार होता, याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही. पण अनेकदा अशा व्हिडीओंमध्ये कर्णधार सर्वप्रथम दिसतो.
रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी खूप यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने संघाला एकूण पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत. पण तरीही त्याच्याकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आले. आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई कशी खेळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.