आयपीएल २०२५ चा ९ वा सामना (३० मार्च) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ३६ धावांनी धुव्वा उडवला.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ १६० धावाच करता आल्या.
मुंबईकडून रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप झाला, तो ८ धावा करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टन हाही ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर सूर्यकुमार यादव (४८) आणि तिलक वर्मा (३९) यांनी ६२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला. हार्दिक पंड्या अखेरपर्यंत चांगली खेळी खेळून संघाला विजय मिळवून देईल, अशी अपेक्षा होती, मात्र, त्याने अननुभवी रॉबिन मिन्झला त्याच्याआधी फलंदाजीसाठी पाठवून मोठी चूक केली.
मुंबई इंडियन्सने पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गमावला होता, पण त्या सामन्यात सामन्यात विघ्नेश पुथूर याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. तो विघ्नेशचा आयपीएल पदार्पण सामना होता, ज्यात त्याने ४ षटकात ३२ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. पण हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या प्लेइंग ११ मध्ये त्याचा समावेश केला नाही, हा कर्णधाराचा चुकीचा निर्णय होता, जो पराभवाचे एक प्रमुख कारण ठरला.
हार्दिक पांड्याने इंग्लंडचा खेळाडू विल जॅकला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवून मोठी चूक केली. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर त्याने शतक झळकावले होते. २८ एप्रिल २०२४ रोजी त्याने याच मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध ४१ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी खेळली होती. आता अशा खेळाडूला बाहेर ठेवणे हा अजिबात चांगला निर्णय नव्हता.
हार्दिक पंड्या हा एक स्फोटक फलंदाज आहे आणि तो त्याच्या आत्मविश्वासासाठीही ओळखला जातो. पण गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने नवख्या रॉबिन मिन्झला स्वत:च्या आधी फलंदाजीला पाठवले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ६२ धावांची भागीदारी केली होती. १२व्या षटकात टिळक वर्मा बाद झाला, त्याला प्रसीध कृष्णाने बाद केले.
यावेळी मुंबई इंडियन्सला विजयासाठी ५१ चेंडूत १०० धावांची गरज होती. टिळकच्या विकेटनंतर हार्दिक पंड्या फलंदाजीला येईल, असे वाटत होते. कारण १० च्या सरासरीने धावा आवश्यक होत्या. पण रॉबिन मिन्झ फलंदाजीला आला. तो ६चेंडूत ३ धावा करून बाद झाला.
संबंधित बातम्या