आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी भारतात सध्या दोन लीग सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्ली प्रीमियर लीग सुरू झाली. ज्याचा पहिला सीझन सध्या खेळला जात आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये UP T20 लीगही सुरू झाली आहे.
दरम्यान, युपी टी-20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने शतक केले आहे. पण मुंबई इंडियन्सने या फलंदाजाला आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या संपूर्ण मोसमात त्याला बेंचवर बसवून ठेवले. पण त्याच फलंदाजने यूपी टी20 लीगच्या या मोसमातील पहिले शतक झळकावले आहे. आर्यन जुयाल असे त्या शतकवीर फलंदाजाचे नाव आहे.
यूपी टी-20 लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. या लीगमध्ये यूपीतील विविध शहरांतील ६ संघ सहभागी होत आहेत. दिल्ली प्रीमियर लीगप्रमाणेच ही स्पर्धाही उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपला ठसा उमटवण्याची संधी देते. एकेकाळी मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या आर्यन जुयालने UP T20 लीग २०२४ मध्ये पहिले शतक झळकावले आहे.
आर्यन जुयाल गोरखपूर लायन्स संघाकडून खेळत आहे. त्याने लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर ५२ चेंडूत शतक केले.
आर्यन जुयालने ५४ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या. त्याच्या शतकाच्या बळावर गोरखपूरने २० षटकात २ गडी गमावून २१८ धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार आणि १० चौकार मारले. अशा प्रकारे त्याने नोएडाच्या गोलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलनेही ४६ चेंडूत ७० धावा केल्या.
प्रत्युत्तरात नितीश राणाच्या नेतृत्वातील नोएडा संघाला १७ षटकांत अवघ्या १२७ धावा करता आल्या. शिवम शर्मा, अंकित राजपूत, सौरभ कुमार आणि विजय यादव यांनी मिळून ९ विकेट घेतल्या, ज्यात एक धावबादही होता.
गोरखपूरने ९१ धावांनी सामना सहज जिंकून यूपी लीगमधील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे.
आर्यन जुयाल आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता. जुयालला २०२२ मध्ये त्याच्या संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर, त्याला आयपीएल २०२३ पूर्वीो संघाने रीलीज केले.