आयपीएल २०२४ चा ३३वा सामना आज (१८ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मुल्लानपूर येथे खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव केला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकामुळे एमआयला मोठी धावसंख्या गाठता आली.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली कारण जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी त्यांच्या स्पेलमध्ये घातक गोलंदाजी केली आणि पंजाबची धावसंख्या केवळ ४ षटकात ४ बाद १४ धावा अशी केली.
पर्पल कॅपधारक जसप्रीत बुमराहने सामन्यात ३ बळी घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पंजाबकडून आशुतोष शर्माने सर्वाधिक धावा केल्या. आशुतोषने २८ चेंडूत ६१ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
शेवटच्या ६ षटकात पंजाब किंग्जला विजयासाठी ६५ धावा हव्या होत्या, पण फक्त ३ विकेट्स हातात होत्या. पण दुसऱ्या टोकाला आशुतोष शर्मा तुफानी शैलीत फलंदाजी करत होता. जेव्हा आकाश मधवाल डावातील १६ वे षटक टाकायला आला तेव्हा त्याने या षटकात २४ धावा दिल्या. इथून सामना एकतर्फी दिसू लागला कारण आता पंजाबला २४ चेंडूत फक्त २८ धावांची गरज होती.
पण १८व्या षटकात आशुतोषची विकेट पडल्यानंतर सामना मुंबईच्या बाजूने झुकला. शेवटच्या २ षटकात पंजाबला २३ धावांची गरज होती. २० चेंडूत २१ धावा करून हरप्रीत ब्रार बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या जवळपास सर्व आशा संपल्या होत्या.
पंजाबला शेवटच्या ६ चेंडूत १२ धावांची गरज होती. हर्षल पटेल आणि कागिसो रबाडा क्रीजवर होते. पण षटकातील पहिल्याच चेंडूवर कागिसो रबाडा दुसरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला.
रबाडा धावबाद होताच पंजाबचा संघ १८३ धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईने हा सामना ९ धावांनी जिंकला.
मुंबई इंडियन्सच्या वतीने जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये पंजाब किंग्जला बॅकफूटवर आणले होते. दोघांनीही अप्रतिम गोलंदाजी करत आपापल्या ४ षटकात ३-३ विकेट्स घेतल्या. बुमराह आता आयपीएल २०१४ मध्ये १३ विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आला आहे. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्या, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. विशेषत: आकाश आणि श्रेयस गोपाल यांनी खूप धावा दिल्या.
तत्पूर्वी, मुंबईने २० षटकांत ७ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली. त्याने ५३ चेंडूत ७८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. रोहित शर्माने ३६ धावा केल्या. तिलक वर्मा ३४ धावा करून नाबाद राहिला.
तर पंजाब किंग्जकडून हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३१ धावा देत ३ बळी घेतले. सॅम करनने १ बळी घेतले. कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली.
संबंधित बातम्या