Mum vs Vid Ranji Trophy Final : मुंबईने विक्रमी ४२ व्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. मुंबईने तब्बल ८ वर्षांनंतर रणजी करंडक जिंकला आहे. याआधी मुंबईने २०१५-२०१६ मध्ये सौराष्ट्राचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
अंतिम सामन्यात मुंबईचा संघ सुरुवातीपासूनच विदर्भावर वर्चस्व गाजवत होता. मुंबईने विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ चौथ्या डावात ३६८ धावांत सर्वबाद झाला.
पण ऑलआऊट होण्याआधी विदर्भाच्या फलंदाजांनी जबरदस्त झुंज दिली. ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची स्थिती एकवेळ ४ बाद १३३ अशी होती. मुंबई लवकरच विदर्भाला गारद करेल, असे वाटत होते. मात्र त्यानंतर करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोलंदाजांना त्रास दिला.
पण यानंतर मुशीर खानने करूण नायरला बाद करत ही जोडी फोडली. नायरने ७४ धावा केल्या. करुण नायर बाद झाल्यानंतरही विदर्भ संघाने हार न मानता झुंज सुरूच ठेवली. कर्णधार अक्षय वाडकरसह हर्ष दुबेने सहाव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी करून मुंबई कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. मात्र, यानंतर तनुष कोटियनने कर्णधार अक्षय वाडकरला (१०२) बाद करून विदर्भ संघाला मोठा धक्का दिला.
वाडकर बाद झाल्यानंतर विदर्भाला गळती लागली. हर्ष दुबेदेखील १२८ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला. ३५३ धावांवर ६ विकेट असणारा विदर्भाचा संघ वाडकर बाद झाल्यानंतर ३६८ धावांवर सर्वबाद झाला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने चमकदार कामगिरी केली. त्यांच्याकडून अजिंक्य रहाणे, मुशीर खान, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला. मुशीरने दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. अय्यरने ९५ धावांची खेळी केली होती. मुंबईने पहिल्या डावात २२४ तर दुसऱ्या डावात ४१८ धावा केल्या होत्या. विदर्भाने पहिल्या डावात १०५ धावा आणि दुसऱ्या डावात ३६८ धावा केल्या.
संबंधित बातम्या