Mumbai Cricketer Dies After Ball Hits: मुंबईच्या माटुंगा येथील मैदानात क्रिकेट खेळताना एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जयेश सावला (वय, ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच मैदानात दोन क्रिकेट सामने खेळले जात होते. त्यावेळी फिल्डिंग करताना दुसऱ्या सामन्यातील चेंडू जयेशच्या कानाला लागला, अशी माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, माटुंगा येथील दादरकर मैदानात सोमवारी एका टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ५० वर्षांवरील लोकांसाठी ही स्पर्धा होती. या मैदानात एकाच वेळी दोन सामने खेळले जात होते. या मैदानावर नेहमीच अनेक सामने एकाच वेळी खेळले जातात. त्यामुळे अनेक खेळाडू जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. परंतु, मृत्यू झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश फिल्डिंग करत असताना दुसऱ्या सामन्यातील चेंडू त्याच्या कानाला लागला. त्यानंतर तो जमीनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयेशला सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास लायन ताराचंद रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जयेश सावला हा व्यापारी होता आणि त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी आणि एक मुलगा आहे.
संबंधित बातम्या