Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे १०० कसोटी कसा खेळणार?; सलग दोन सामन्यांत गोल्डन डकवर बाद
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे १०० कसोटी कसा खेळणार?; सलग दोन सामन्यांत गोल्डन डकवर बाद

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे १०० कसोटी कसा खेळणार?; सलग दोन सामन्यांत गोल्डन डकवर बाद

Jan 19, 2024 02:55 PM IST

Ajinkya Rahane Golden Duck Ranji Trophy : मुंबईने याआधीच्या सामन्यात आंध्र प्रदेशचा पराभव केला होता. त्या सामन्यानंतर रहाणेने भारतासाठी १०० कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या नावावर सध्या ८५ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने आहेत.

Ajinkya Rahane
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane Golden Duck Ranji Trophy : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने काही दिवसांआधीच १०० कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर आहे आणि त्याची कामगिरी अगदीच सामान्य आहे. 

आता तो रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. रणजी सामन्यातही त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. त्यामुळे त्याचे टीम इंडियात पुनरागमन होणे कठीणच आहे. तो सलग दोनवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. 

मुंबईने याआधीच्या सामन्यात आंध्र प्रदेशचा पराभव केला होता. त्या सामन्यानंतर रहाणेने भारतासाठी १०० कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या नावावर सध्या ८५ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये तो भारतीय संघात परतला. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही.

रहाणेन सलग दोन सामन्यात शुन्यावर बाद

अजिंक्य रहाणेला टीम इंडियात परतायचे आहे. पण दुसरीकडे त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. रणजी ट्रॉफीत केरळविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला. याआधीच्या सामन्यात आंध्रविरुद्धही तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर क्रीजवर आलेला रहाणे बासिल थम्पीचा बळी ठरला. यष्टिरक्षक संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला.

मुंबई आणि केरळ यांच्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबईचा सलामीवीर जय गोकुळ बिश्त पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील अजिंक्य रहाणेला लवकर क्रीझवर यावे लागले. पण अजिंक्य रहाणेही पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. 

WTC फायनलमध्ये सर्वाधिक धावा

अजिंक्य रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याचा संघात समावेश करण्यात आला. श्रेयस अय्यरची दुखापत हे देखील त्याच्या संघातील समावेशाचे प्रमुख कारण होते. रहाणेने WTC च्या अंतिम सामन्यात ८९ आणि ४६ धावांची खेळी खेळली. 

त्या सामन्यात तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला २ सामन्यांत केवळ ११ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला संधी मिळाली नाही.

आता त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही संघात स्थान मिळालेले नाही. ३५ वर्षीय रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी खेळल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ५०७७ धावा आहेत. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. ऐतिहासिक गाबा कसोटीतही तो संघाचा कर्णधार होता.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या